कोजिमाशिच्या सत्ताधाऱ्यांनी सभासदांच्या डोक्यावरील आर्थिक भार वाढविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:23 IST2021-02-10T04:23:45+5:302021-02-10T04:23:45+5:30
बोरवडे : ...

कोजिमाशिच्या सत्ताधाऱ्यांनी सभासदांच्या डोक्यावरील आर्थिक भार वाढविला
बोरवडे : कोजिमाशितील सत्ताधाऱ्यांनी मनमानी कारभार करून सभासदांच्या डोक्यावरील आर्थिक भार कमी करण्याऐवजी जादा कसा होईल याकडे लक्ष दिले असून, सभासदाभिमुख कारभार न करता स्वयंघोषित नेत्यांच्याकडून मनमानी कारभार सुरू आहे. आपला विरोध व्यक्तीला नसून चाललेल्या अपप्रवृत्तीला आहे. जिल्ह्यातील सर्व संघटनांनी अशा हुकूमशाहीला हद्दपार करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बिद्री (ता. कागल) येथील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
ताळेबंद आधारावर नोकर भरती करणे आवश्यक असताना संचालकांच्या मनाप्रमाणे गरजेपेक्षा जादा नोकर भरती करून त्यांचा वाढीव पगार सभासदांच्या माथी मारला आहे.
सभासदांच्या नियमित कर्जाचा व्याजदर गेल्या १७ वर्षांत फक्त तीन टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. तो सुद्धा केडीसीसी बँकेने व्याजदर कमी केला आहे म्हणूनच, शिवाय निवडणूक तोंडावर आलेली आहे म्हणूनच. हा व्याजदर प्रत्यक्ष नऊ टक्के हवा असताना कारभाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी तो कमी केलेला नाही.
याशिवाय सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वाटलेल्या बॅगच्या किमतीबद्दल सभासदांमध्ये संभ्रमावस्था आहे. सभासदांना जादा व्याज द्यावे लागते म्हणून चिरंतन ठेव परत नेण्यास भाग पाडल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
पत्रकार परिषदेस शिक्षक संघाचे अध्यक्ष बी. एस. खामकर, कार्यवाहक सुरेश खोत, विभागीय प्रमुख बाळासो चिंदगे, एन. एस. सारंग उपस्थित होते.