किसान सभेची बिंदू चौकात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:21 IST2021-01-21T04:21:59+5:302021-01-21T04:21:59+5:30
कोल्हापूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून मुंबईत राजभवनावर सोमवारी निघणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी कोल्हापुरात जनजागृती आंदोलन करण्यात ...

किसान सभेची बिंदू चौकात निदर्शने
कोल्हापूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून मुंबईत राजभवनावर सोमवारी निघणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी कोल्हापुरात जनजागृती आंदोलन करण्यात आले. बुधवारी दुपारी बिंदू चौकात किसान सभेच्यावतीने झालेल्या आंदोलनात सीटू संलग्न सर्व कामगार संघटना सहभागी झाल्या.
शेतकरी व कामगारविरोधी धोरणे राबविणाऱ्या केंद्र सरकारला हिसका दाखवण्यासाठी आणि दिल्लीत दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदाेलनाला पाठिंबा म्हणून अखिल भारतीय किसान सभेने येत्या सोमवारी (दि.२५) मुंबईत राजभवनावर मोर्चा आणि मंगळवारी आझाद मैदानावर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एकत्रित झेंडावंदन अशा आंदोलनाचे नियोजन केले आहे. या संदर्भात कोल्हापुरातून सहभाग वाढण्याकरता जनजागृती म्हणून बुधवारी बिंदू चौकात जनजागृती आंदोलन झाले.
सीटूचे कार्याध्यक्ष चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखाली डाव्या संघटनांचे सर्व कार्यकर्ते एकत्र जमले. त्यांनी कृषी व कामगार कायदे लादणाऱ्या माेदी सरकारच्या निषेधार्थ घोषणांनी परिसर दणाणून साेडला. निदर्शनानंतर एकत्रित चर्चेनंतर मुंबईतील या दोन दिवसीय आंदोलनात सहभागी होण्यासाठी ८ ते १० गाड्या घेऊन जाण्याचे ठरले. त्यासाठी रविवारी संध्याकाळीच कोल्हापुरातून रवाना होण्याचेही ठरले.
आंदोलनात किसान सभेचे शहर सचिव शंकर काटाळे, कामगार संघटनेचे भरमा कांबळे, बांधकाम कामगार संघटनेचे शिवाजी मगदूम, आशा कर्मचारी संघटनेच्या ज्योती तावरे, सीटूचे डॉ. सुभाष जाधव, अन्य संघटनांचे सुभाष मगदूम, दत्ता माने, संदीप सुतार यांच्यासह डावे कार्यकर्ते सहभागी झाले.
(फोटो देत आहे)