Kolhapur Crime: लिंक ओपन केली अन् फसले; कराडच्या व्यवसायिकाला ६.६९ कोटींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 15:50 IST2026-02-12T15:50:11+5:302026-02-12T15:50:32+5:30
दोघांवर जयसिंगपुरात गुन्हा दाखल

Kolhapur Crime: लिंक ओपन केली अन् फसले; कराडच्या व्यवसायिकाला ६.६९ कोटींचा गंडा
जयसिंगपूर : शेअर बाजारात जादा परताव्याचे आमिष दाखवून ६ कोटी ६९ लाख ८१ हजारांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी अज्ञातांवर सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद औषध व्यावसायिक अजय नंदकिशोर भट्ट (वय ५२, रा. शनिवार पेठ, कराड, जि. सातारा) यांनी दिली आहे. लिंक पाठवून मोबाईल ॲप डाऊनलोड करायला लावून कराड आणि जयसिंगपूर येथे फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
फिर्यादी भट्ट यांनी मोबाईलवर आलेली शेअर्स ट्रेडिंग मार्केटची लिंक उघडली. अज्ञात दोघांनी फिर्यादी यांना व्हॉट्सॲपने कमी रेटमध्ये भारतीय बाजाराचे शेअर्स खरेदी करून दुसऱ्या दिवशी जास्त परताव्याने विक्री करण्याचे आमिष दाखविले. फिर्यादी यांना व्हॉट्सॲप ग्रुपवर ॲड करून तसेच फिर्यादीच्या मोबाईलवर एसआयजी नावाचे ॲप डाऊनलोड करून दिले.
त्यानंतर फिर्यादीला डिस्काऊंट रेटमध्ये भारतीय बाजारातील शेअर्स विकत घेण्यास सांगून जादा परताव्याचे आमिष दाखविले. त्यानंतर वेगवेगळ्या खात्यामध्ये पैसे भरण्यास सांगून फिर्यादीला आजअखेर कोणताही परतावा न देता दोघांनी ६ कोटी ६९ लाख ८१ हजार रकमेची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
लिंक ओपन केली अन् फसले
जयसिंगपूर येथे नातेवाईकांकडे आल्यानंतर भट्ट यांच्या मोबाईलवर एसआयजी या नावाने शेअर्स ट्रेडिंग मार्केट म्हणून एक लिंक आली. ती लिंक ओपन केल्यानंतर दोन मोबाईल क्रमांक आले. या क्रमांकावरून अज्ञातांनी त्यांच्या व्हॉट्सॲपवर शेअर बाजाराची माहिती दिली. यातच भट्ट फसले. त्यांनी तत्काळ पन्नास हजार रुपये जमा केले. त्यानंतर आरटीजीएसद्वारे रक्कम जमा करत गेले. त्यानंतर फसवणाऱ्या व्यक्तीनी त्यांना वेगवेगळ्या बँकांचे खाते क्रमांक दिले. मोठी रक्कम जमा झाल्यानंतर परतावा मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.