Kolhapur: मंत्री मुश्रीफांसाठी सख्ख्या भावाबरोबर वैरत्व पत्करले. पण..; प्रवीणसिंह पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 12:48 IST2025-10-06T12:47:48+5:302025-10-06T12:48:10+5:30
मुरगूड येथील बैठकीत केले शिक्कामोर्तब

Kolhapur: मंत्री मुश्रीफांसाठी सख्ख्या भावाबरोबर वैरत्व पत्करले. पण..; प्रवीणसिंह पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार
मुरगूड : गेल्या वीस वर्षांपासून आपण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रामाणिक काम करत होतो. त्यांच्यासाठी सख्ख्या भावाबरोबर वैरत्व पत्करले. पण, वारंवार माझ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात हालचाली सुरू होत्या. कोणाच्या तरी सांगण्यावरून माझ्यावर, माझ्या गटावर अविश्वास दाखवला जात होता. यामुळेच आपण मुश्रीफ यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे शेतकरी संघांचे माजी अध्यक्ष, बिद्री कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह पाटील यांनी जाहीर केले.
मुरगूड येथील निवासस्थानी पार पडलेल्या तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. प्रवीणसिंह पाटील यांचा मंगळवारी मुंबई येथे कार्यकर्त्यांसह भाजपा कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश होणार आहे.
पाटील म्हणाले, मुश्रीफ यांच्याबरोबर जाताना आपण त्यांना शब्द दिला होता. त्यामुळे कार्यकर्ते तक्रार करत आल्यानंतर आपण त्यांची समजूत काढत होतो. पण, काही दिवसांपूर्वी मुश्रीफ यांनी एका जबाबदार व्यक्तीकडून राजकारण करताना सावध पावले उचला, अन्यथा त्रास होईल, असा संदेश दिला. मुरगूडबाबत कोणताही निर्णय घेताना आपल्याला डावलले जात होते. जनमानसात ज्याची प्रतिमा बरबटलेली आहे, त्याच्याबरोबर जाण्याची आपली अजिबात इच्छा नाही. त्यामुळे भाजपामध्ये जाण्याच्या निर्णय घेतला.
सुधीर सावर्डेकर यांनी स्वागत केले. सुरेश लंबे, अमर कांबळे, संपत कोळी, संभाजी गायकवाड, कृष्णात कापशे, मारुती कांबळे, संजय भारमल, अरुण पाटील, सुधीर मसवेकर, शिवाजीराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस दिग्विजय पाटील, आंनदराव कल्याणकर, आनंदा पाटील, एम. बी. ठाणेकर, प्रकाश पाटील, भरत घोटणे, दत्तात्रय पाटील, अरुण पाटील, बाळासो आंगज, दादासो चौगले व संजय मोरबाळे आदी उपस्थित होते.
भावाबाबत कोणतीच अडचण नव्हती
आपले बंधू रणजितसिंह पाटील मुश्रीफ यांच्याकडे येत आहेत म्हणून आपण मुश्रीफ यांना सोडत आहोत, हा गैरसमज आहे. आम्ही एकत्र बोलून निर्णय घेतले असते तर कोणतीच अडचण नव्हती. शेवटी आम्ही भाऊच आहोत. त्यांनी जो मार्ग निवडला तो चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले.