मराठीचे विद्यार्थी लिहीताहेत ही अभिमानाची बाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:24 IST2021-01-20T04:24:31+5:302021-01-20T04:24:31+5:30

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे केवळ शिक्षकच नव्हे, तर विद्यार्थीसुद्धा लिहीताहेत, ही अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन ...

It is a matter of pride that Marathi students are writing | मराठीचे विद्यार्थी लिहीताहेत ही अभिमानाची बाब

मराठीचे विद्यार्थी लिहीताहेत ही अभिमानाची बाब

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे केवळ शिक्षकच नव्हे, तर विद्यार्थीसुद्धा लिहीताहेत, ही अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी सोमवारी केले.

शिवाजी विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त लेखक विष्णू पावले यांच्या ‘पधारो म्हारो देस’ आणि डॉ. सयाजी गायकवाड यांच्या ‘मराठी पोवाडा (तीन भाग)’ या पुस्तकांच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.

छोटी वाक्ये, प्रासादिक व ओघवती भाषा ही विष्णू पावले यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे ‘पधारो म्हारो देस’ हे उत्तम प्रवास वर्णनाचा नमुना आहे. डॉ. गायकवाड यांनी ‘मराठी पोवाडा (तीन भाग)’ हा संशोधनग्रंथ साकारून मराठी साहित्याच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे. पोवाड्यासारख्या प्रेरित करणाऱ्या लोककलांच्या अनुषंगाने साहित्यनिर्मिती होणे हे मोठे सुलक्षण असल्याचे डॉ. हिर्डेकर यांनी सांगितले. या कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे उपस्थित होते. मराठी अधिविभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. विष्णू पावले, डॉ. गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले. सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले.

चौकट

संशोधन ग्रंथाचा वस्तुपाठ

पोवाड्यावरील सर्वंकष माहितीने परिपूर्ण असलेला गायकवाड यांचा ग्रंथ हा संशोधन ग्रंथ कसा असावा, याचा सुंदर वस्तुपाठ आहे. पावले यांनी उत्कृष्ट प्रवास वर्णनाचा नमुना सादर केला असल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले.

फोटो (१९०१२०२१-कोल-विद्यापीठ पुस्तक प्रकाशन) : शिवाजी विद्यापीठात सोमवारी डॉ. सयाजीराव गायकवाड यांच्या ‘मराठी पोवाडा (तीन भाग)’ या पुस्तकाचे प्रकाशन शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी.एम. हिर्डेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, विष्णू पावले, रणधीर शिंदे, विलास नांदवडेकर, नंदकुमार मोरे, व्ही. एन. शिंदे उपस्थित होते.

Web Title: It is a matter of pride that Marathi students are writing