Kolhapur: लिफ्ट मागितली, गाडीवर बसला, मागूनच वार केला; चिपरीतील तरुणाच्या खून प्रकरणी तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:29 IST2025-08-08T17:29:08+5:302025-08-08T17:29:26+5:30
सहा तासांत आरोपींना अटक

Kolhapur: लिफ्ट मागितली, गाडीवर बसला, मागूनच वार केला; चिपरीतील तरुणाच्या खून प्रकरणी तिघांना अटक
जयसिंगपूर : जुन्या वादाचा राग मनात धरूनच चिपरी (ता. शिरोळ) येथील संदेश लक्ष्मण शेळके (वय २२) या तरुणाचा खून झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी तिघा आरोपींना जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली. युवराज रावसाहेब माळी (३०, रा. फिल्टर हाउसजवळ चिपरी), सूरज बाबासो ढाले (३०, रा. खोची, ता. हातकणंगले) व गणेश संभाजी माळी (२५, रा. माळभाग चिपरी) या आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
मोपेडवरून लिफ्ट मागून आलेल्या युवराजनेच संदेशचा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत संदेश याच्या बहिणीने युवराजच्या आईबद्दल अपशब्द वापरला होता. याचा राग मनात धरूनच हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
संदेश हा मोपेडवरून चिपरी येथे जात असताना त्याच्यावर अज्ञातांनी धारदार हत्याराने वार करून खून केल्याची घटना बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली होती. खुनाची घटना वाऱ्यासारखी चिपरीसह परिसरात पसरली होती. नेमका खून कोणत्या कारणातून झाला. याबाबत तर्कवितर्क सुरू होते. गावाजवळच खुनाची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली होती. घटनेनंतर तत्काळ पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान केली.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून पाहणी केली असता संदेश याच्या मोपेडवरून पावसाळी जर्किन घातलेला व्यक्ती बसून आल्याचे दिसून आले होते. त्याच्या वर्णनावरून पोलिसांनी माहिती मिळवली. आरोपी कर्नाटकातील चिक्कोडी येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून तिघा आरोपींना अटक करण्यात आली. त्यांनी खुनाची कबुली दिली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी दिली.
सहा तासांत आरोपींना अटक
खुनाच्या घटनेनंतर आरोपी युवराज हा सूरज व गणेश यांच्या मदतीने कर्नाटकात पळून गेला होता. चिक्कोडी येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अवघ्या सहा तासांत आरोपींना अटक केली. सीसीटीव्ही फुटेज व खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने आरोपींचा शोध लावला.
लिफ्ट दिली अन् घात झाला
बहिणीला चिपरी फाटा येथे सोडून संदेश गावाकडे येत असताना लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने युवराज हा त्याच्या मोपेडवर बसला. घोडावत ऑइल मिलजवळील राजू सूर्यवंशी यांच्या घराकडे जाणाऱ्या मार्गावर आल्यानंतर संदेशच्या मानेवर आरोपीने धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केला. त्यानंतर सूरज व गणेश यांच्या मदतीने युवराज हा कर्नाटकात पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.