कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ७९ कर्मचाऱ्यांभोवती अपहार, गैरवर्तनाच्या चौकशीचा फेरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 18:35 IST2025-05-20T18:34:48+5:302025-05-20T18:35:18+5:30

ग्रामपंचायत, बांधकाम, शिक्षणमधील कर्मचाऱ्यांची संख्या अधिक

Investigations underway into embezzlement and misconduct against 79 employees of Kolhapur Zilla Parishad | कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ७९ कर्मचाऱ्यांभोवती अपहार, गैरवर्तनाच्या चौकशीचा फेरा

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ७९ कर्मचाऱ्यांभोवती अपहार, गैरवर्तनाच्या चौकशीचा फेरा

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे तब्बल ७९ कर्मचारी सध्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत. यामध्ये गैरवर्तन, अपहार, लाच, नियमबाह्य कामकाज, कर्तव्यात कसूर अशा विविध कारणांनी या सर्वांची चौकशी सुरू आहे. सर्वाधिक ५९ कर्मचारी हे ग्रामपंचायत विभागाकडील ग्रामपंचायत अधिकारी आहेत. तर, त्याखालोखाल बांधकाम विभाग आणि प्राथमिक शिक्षण विभागाचा नंबर लागतो. यामध्ये एक वर्षाच्या आतील ३३ प्रकरणे असून, ४६ प्रकरणे एक वर्षावरील आहेत.

जिल्हा परिषदेच्या विविध १६ विभागांच्या वतीने ग्रामीण भागात विकासाची आणि प्रशासकीय कामे केली जातात. जिल्ह्यात १०२६ ग्रामपंचायती असून, सुमारे दोन हजार प्राथमिक शाळा आहेत. बांधकाम विभागाची कोट्यवधी रूपयांची कामे जिल्ह्यात सुरू असतात. तर, आता वित्त आयोगाच्या माध्यमातून मोठा निधी ग्रामपंचायतीच्या खात्यावर थेट जमा केला जात आहे.

त्यामुळेच गावपातळीवर ग्रामपंचायतीत नियमबाह्य कामकाज, आर्थिक अपहार, निधीचा अपव्यय अशा प्रकरणांची संख्या अधिक आहे. त्यामुळे चौकशी सुरू असलेल्या ७९ कर्मचाऱ्यांपैकी तब्बल ५९ कर्मचारी हे ग्रामपंचायत विभागाकडील आहेत. यातील ५० हून अधिक जण ग्रामपंचायत अधिकारी आहेत.

अनेक ठिकाणी दोन आघाड्या एकत्र येऊन ग्रामपंचायतीत सत्ता स्थापन करतात. असे कामकाज करताना सामंजस्याने केले जाते. परंतु, नंतर राजकीय मतभेद झाल्यानंतर किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुका तोंडावर आल्यानंतर मग अशी प्रकरणे बाहेर काढण्याचे प्रमाण यामध्ये अधिक असल्याचेही दिसून आले आहे. बांधकाम विभागाचीही लाच आणि गैरप्रकाराची प्रकरणे असून, शिक्षकांनी गैरवर्तन केल्याने अशांची चौकशी सुरू असलेल्यांची देखील संख्या अधिक आहे.

आठ जणांनी घेतली लाच

या ७९ पैकी ८ जणांना लाच घेताना पकडण्यात आले आहे. या सर्वांना निलंबित करण्यात आले असून, त्यांची विभागीय चौकशी सुरू आहे. या चौकशीत सहा महिने-वर्ष गेल्यानंतर अहवालातील गांभीर्य कमी करून अनेकदा या सर्वांना लवकरात लवकर पुन्हा कामावर घेण्यासाठीची यंत्रणाही तातडीने कार्यरत होते हे वास्तव आहे.

ही आहेत चौकशीची कारणे

विद्यार्थिनींशी गैरवर्तन, आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल, आर्थिक फसवणूक, नियमबाह्य कामकाज, कर्तव्यात कसूर, अनधिकृत गैरहजर, आर्थिक अनियमितता, लाच स्वीकारताना अटक, दप्तर हलगर्जीपणा, आर्थिक अपहार.

विभाग -  चौकशी सुरू असलेली प्रकरणे
ग्रामपंचायत - ५९
बांधकाम - ०८
प्राथमिक शिक्षण - ०७
सामान्य प्रशासन - ०३
वित्त विभाग - ०२
एकूण -  ७९

Web Title: Investigations underway into embezzlement and misconduct against 79 employees of Kolhapur Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.