Kolhapur: टीईटी पेपर फुटीचा तपास बिहारपर्यंत; आणखी तीन एजंट ताब्यात, म्होरके पसारच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 11:57 IST2025-12-04T11:56:33+5:302025-12-04T11:57:20+5:30
रितेश कुमारच्या मित्रांची चौकशी, तपास पथक बिहारमध्ये तळ ठोकून

Kolhapur: टीईटी पेपर फुटीचा तपास बिहारपर्यंत; आणखी तीन एजंट ताब्यात, म्होरके पसारच
कोल्हापूर : टीटीई आणि सेटचा पेपर फोडणाऱ्या टोळीतील आणखी तीन एजंट पोलिसांच्या हाती लागले. कराड परिसरातून त्यांना बुधवारी (दि. ३) चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, प्रश्नपत्रिका पुरवणारा बिहारचा रितेशकुमार आणि त्याचे साथीदार अजूनही पोलिसांना सापडलेले नाहीत. त्यांच्या शोधासाठी बिहारला गेलेल्या तपास पथकाने रितेश कुमारच्या मित्रांची चौकशी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
टीईटी पेपर फुटीच्या गुन्ह्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. अटकेतील गुन्ह्याचा सूत्रधार महेश गायकवाड आणि काही एजंटच्या चौकशीतून त्यांच्या साथीदाराची नावे पोलिसांना मिळत आहेत. कराड परिसरातील आणखी तीन एजंटची नावे पोलिसांना मिळाली. बुधवारी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौकशीतून या गुन्ह्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सहभाग आढळताच त्यांच्यावरही गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करणार असल्याची माहिती तपास अधिकारी उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांनी दिली. अटकेतील एजंट आणि गायकवाड बंधूंच्या कॉल डिटेल्सवरून पुढील तपास सुरू आहे. आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.
तपास पथक बिहारमध्ये तळ ठोकून
कराडमधील गायकवाड बंधूंना प्रश्नपत्रिका पुरवणारा रितेशकुमार आणि त्याच्या साथीदारांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपनिरीक्षक संतोष गळवे यांचे पथक बिहारला गेले आहे. पाटणा येथील स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने संशयितांचा शोध सुरू आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच रितेशकुमार आणि त्याचे साथीदार गायब झाल्याची माहिती त्यांचे नातेवाईक आणि मित्रांनी दिली.
लाभार्थ्यांचाही शोध सुरू
पेररफुटीचा लाभ घेऊन टीईटी, सेट पात्र ठरलेले आणि सध्या शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या लाभार्थ्यांचा शोध सुरू आहे. गैरप्रकार केल्याचे स्पष्ट होताच त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जाणार आहेत. पेपर फोडणाऱ्यांपासून सर्व एजंट आणि लाभ घेतलेल्या उमेदवारांवरही कारवाई झाल्याशिवाय तपास थांबणार नाही, अशी माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली.