कोल्हापूर : भारतीय नागरिकांना विदेशात आंतरराष्ट्रीय चालक परवान्याकरिता अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्याकरिता केंद्र शासनाने आंतरराष्ट्रीय चालक परवाना अर्ज, नमुना, शुल्क आणि नियमात बदल केला असून आता त्या त्या भारतीय दूतावासामार्फत नूतनीकरण करता येणार आहे.
शिक्षण, नोकरीनिमित्त परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांना एक वर्षासाठी आंतरराष्ट्रीय चालक परवाना भारतातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दिला जात होता. परदेशात असताना मुदत संपल्यानंतर त्या भारतीयांना वाहन चालविता येत नव्हते. भारतात परतल्यानंतरच तो परवाना नूतनीकरण करता येत होता. ही अडचण लक्षात घेऊन केंद्र शासनाने केंद्रीय मोटार वाहन नियमात सुधारणा केली. त्यात अर्जाचा नमुना, परवाना शुल्क आदींमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे हा परवान्याची मुदत संपल्यानंतर आता त्या त्या देशातील भारतीय दूतावासातच भारतीय नागरिकांना नूतनीकरण करून घेता येणार आहे. त्यासाठी दोन हजार रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहे. यासंबंधीची अधिसूचना केंद्राने नुकतीच जाहीर केली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डाॅ. स्टीव्हन अल्वारीस यांनी दिली.