लोकमत न्यूज नेटवर्क
खोची:बुवाचे वाठार येथील ग्रामपंचायतीच्या दुरंगी लढतीत काँग्रेस समर्थक शंकरराव शिंदे, सुनील चौगुले, दिलावर सुतार, मदन अनुसे यांच्या नेतृत्वाखालील उद्धवराज महाराज ग्रामविकास महाघाडीने अकरापैकी दहा जिंकत मताधिक्याने विजय संपादन केला. वारणा गटाचे समर्थक भीमराव शिंदे, गुणधर मडके, संपतराव पाटील ,शेखर बुवा यांच्या नेतृत्वाखालील उद्धवराज महाराज ग्रामविकास आघाडीचा दारुण पराभव झाला.
विजयानंतर गावात महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी,गुलालाची,भंडाऱ्याची उधळण करीत जल्लोष केला. उद्धवराज महाराज मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सर्व विजयी उमेदवार तसेच पॅनेल प्रमुख, कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामस्थांनी एकतर्फी सत्ता सोपवून मोठा विश्वास दाखविला आहे. गावातील सर्व प्रश्नांची सोडवणूक करून विकासाची कामे गतीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. कोणताही गट तट न पाहता विकासाला महत्त्व दिले जाईल, असे आश्वासन शंकरराव शिंदे यांनी यावेळी दिले.
यावेळी सुनील चौगुले, मोहन चौगुले, रामचंद्र अनुसे, अरुण कांबळे, दिनकर शिंदे, अनिल सूर्यवंशी,संजय चौगुले, दिलावर सुतार,उत्तम चौगुले, दिनकर शिंदे,आनंदा परीट,भीमराव बावचे, बंडू परीट,कुबेर चौगुले उपस्थित होते.
मदन अनुसे यांनी आभार मानले.