कोल्हापूर : केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन व व्याजाचे उत्पन्न करमुक्त केल्याचा फायदा जिल्ह्यातील ५० हजारांवर ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. मात्र ज्येष्ठ नागरिकांना अन्य स्रोतांपासून उत्पन्न मिळत असेल तर त्यांना आयकर विवरणपत्र भरावे लागणार आहे.
कोल्हापूर शहरात १ लाख, तर जिल्ह्यात ६ लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांपैकी ८ ते ९ टक्के ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनचा लाभ मिळतो. ही संख्या ५० हजारांच्या आसपास जाते. ज्या नागरिकांची पेन्शन ५० हजारांच्या वर आहे; तसेच त्यांना व्याजाचे उत्पन्न मिळत असेल तर त्यांच्यावर प्राप्तिकर लावला जात होता. तसेच त्यांना विवरणपत्र भरावे लागत होते. प्राप्तिकरातून सूट मिळावी यासाठी त्यांना अन्य प्रकारच्या योजनांमध्ये पैसे गुंतवावे लागत होते. सोमवारी (दि. १) सादर झालेल्या अर्थसंकल्पात मात्र ही अट रद्द करण्यात आली असून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्राप्तिकरातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना मिळणारी पेन्शन व त्यावरील व्याजाचे उत्पन्न आता करमुक्त झाल्याने वृद्धांना दिलासा मिळाला आहे.
केंद्राच्या या निर्णयाचे ज्येष्ठांनी स्वागत केले आहे. मात्र यात व्यवसायात असलेल्या ज्येष्ठांचा विचार केलेला नाही, असा एक तक्रारीचा सूर आहे. जिल्ह्यात ज्याप्रमाणे पेन्शरांची संख्या मोठी आहे, त्याच प्रमाणात ते व्यवसायातही आहेत. अशा व्यावसायिकांना करातून सूट मिळालेली नाही, त्यांचाही विचार होणे गरजेचे आहे. असे काही ज्येष्ठांचे म्हणणे आहे.
--
पेन्शनच्या रकमेची बँकेत एफडी केली की त्यावर मिळणारे व्याज हे प्राप्तिकरापेक्षा कमी असायचे; शिवाय यातील ३० टक्के रक्कम कर भरण्यातच जायची. आता प्राप्तिकरात सूट मिळाल्याने दिलासा मिळाला आहे. पण व्यवसायातील ज्येष्ठांचाही यात विचार व्हायला हवा होता.
- मानसिंग जगताप (राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक संघ)
---