Kolhapur: दोन कारची समोरासमोर धडक, कसबा बावड्यातील एकजण ठार; देवदर्शनाहून परतताना झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:55 IST2025-12-30T11:53:55+5:302025-12-30T11:55:33+5:30
सहाजण जखमी

Kolhapur: दोन कारची समोरासमोर धडक, कसबा बावड्यातील एकजण ठार; देवदर्शनाहून परतताना झाला अपघात
कोल्हापूर : सोलापूर जिल्ह्यातील देवदर्शनानंतर गावाकडे परतताना गुहागर-विजापूर मार्गावर खानापूरजवळ दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार झाले, तर सहा जण जखमी झाले. हा अपघात सोमवारी सायंकाळी तामखडीजवळ झाला. या अपघातात विश्वास शामराव चौगुले (वय ५९, सध्या रा. कऱ्हाड, जि. सातारा. मूळ रा. कसबा बावडा, कोल्हापूर) हे ठार झाले. त्यांच्या पत्नी व मुले किरकोळ जखमी झाली.
अपघात स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे कोल्हापुरातील कसबा बावडा येथे राहणारे विश्वास चौगुले व्यवसायाच्या निमित्ताने कुटुंबियांसह सध्या कराडमध्ये राहतात. ते पत्नी सुरेखा, दोन मुले आणि मित्र तानाजी जाधव (रा. वाठर, ता. कराड) लता विष्णू कुंभार (रा. वाठार) यांच्यासह देवदर्शनासाठी सोलापूर जिल्ह्यात गेले होते. परत येताना तामखडी गावाजवळ दोन कारची समोरासमोर धडक झाली.
दुसऱ्या कारमधील यश वेदपाठक, संचिता वेदपाठक, शालन वेदपाठक हे जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने भिवघाट येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान विश्वास चौगुले यांचा मृत्यू झाला. इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल येळेकर करत आहेत.