भ्रष्टाचारी महासम्राटाला विसर्जित करा

By Admin | Updated: September 7, 2015 00:49 IST2015-09-07T00:46:45+5:302015-09-07T00:49:57+5:30

मजूर संघाची सभा : उदय जोशी यांची मुकुंद पोवार यांच्यावर टीका

Immerse the corrupt Mahasamatta | भ्रष्टाचारी महासम्राटाला विसर्जित करा

भ्रष्टाचारी महासम्राटाला विसर्जित करा

कोल्हापूर : गेल्या दोन वर्षांत संस्था कशी चालविली जाते हे विरोधकांना दाखवून दिले आहे तरीही ज्यांनी भ्रष्टाचाराचा उच्चांक केला, अशी मंडळी ‘विरोधाला विरोध’ म्हणून काही मंडळी टीका करीत सुटली आहे, अशा महासम्राटांना विसर्जित करा, अशी टीका मजूर संघाचे अध्यक्ष उदय जोशी यांनी केली. संघाची सभा शाहूपुरी येथील संस्था कार्यालयात रविवारी झाली. यावेळी ते बोलत होते. प्रास्ताविकात अहवाल सालातील कामकाजाचा आढावा घेत अध्यक्ष उदय जोशी म्हणाले, विरोधकांची दहा वर्षे संघावर सत्ता होती, त्यावेळी त्यांनी काय उजेड पाडला हे सभासदांना माहीत आहे. मुकुंद पोवार यांच्या गाडीचा खर्च साडेचार लाख रुपये होता. आमच्या दोन वर्षांतील कारभाराचा आढावा घेतल्यास पारदर्शक कारभार कशाला म्हणतात, हे सभासदांना दिसेल. सभासद संस्थांना दोन वर्षांत शंभर कोटींच्या कामांचे वाटप केले आहे. प्रत्येक संस्थेला किमान ५० लाखांचे काम देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पण, विरोधकांनी केवळ न्यायालयीन प्रक्रियेत संस्थेला अडकून टाकण्याचा उद्योग केला आहे. माझी त्यांना विनंती आहे, न्यायालयातील सर्व दावे त्यांनी मागे घ्यावेत, निष्कारण संस्थेला खर्चात पाडू नये, असे आवाहनही उदय जोशी यांनी केले. निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेता येत नसले तरी आगामी काळात सभासद हिताचेच निर्णय आमच्या हातून घेतले जातील. सभासदांनी निवडणुकीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जोशी यांनी केले.
जयसिंग पाटील म्हणाले, सत्तारूढ गटाने कारभार चांगला केला आहे. निवडणुकीसाठी त्यांनी एकत्र येऊन चर्चा करण्याचे आवाहन केले आहे, एकत्र बसण्यास हरकत नाही. संचालक भीमराव नलवडे यांनी आभार मानले. तुकाराम पाटील, बाळासाहेब जंगन्नवार, आप्पासाहेब पाटील, वाय. व्ही. पाटील, महादेव सांगले, रमेश साळोखे, नारायण देसाई, जयसिंग चव्हाण, सुरेश पाटील, बबन कोळी, सुभाष साळोखे, राजू मोहिते, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


निवडणुकीवरच चर्चा!
मजूर संघाची सर्वसाधारण सभा असल्याने अहवाल सालातील कामकाजावर चर्चा अपेक्षित होती. कामकाजावर कमी आणि निवडणुकीवरच सभेत अधिक चर्चा झाली.

Web Title: Immerse the corrupt Mahasamatta