Kolhapur: बेकायदेशीर पार्टीचे आयोजन, उजळाईवाडीतील कॅफेवर पोलिसांची कारवाई; चौघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 05:39 PM2023-12-25T17:39:13+5:302023-12-25T17:49:35+5:30

मद्यसाठ्यासह एकूण २ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त

Illegal party organized, police action on cafe in Ujalaiwadi kolhapur | Kolhapur: बेकायदेशीर पार्टीचे आयोजन, उजळाईवाडीतील कॅफेवर पोलिसांची कारवाई; चौघांविरोधात गुन्हा दाखल

Kolhapur: बेकायदेशीर पार्टीचे आयोजन, उजळाईवाडीतील कॅफेवर पोलिसांची कारवाई; चौघांविरोधात गुन्हा दाखल

उचगाव: उजळाईवाडी (ता. करवीर) येथील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गानजीक शाहु टोल नाक्याशेजारी असलेल्या एका कॅफेवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत मद्यसाठ्यासह एकूण २ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चोघांजणाविरोधात गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कॅफेचे मालक दयानंद जयवंत साळोखे (रा. उजळाईवाडी), इव्हेंटकर्ते मयुरा रामचंद्र चुटाणी (रा. नागाळा पार्क, कोल्हापूर), डी.जे ऑपरेटर नागेश लहू खरात (रा.फुलेवाडी), डी.जे मालक दिगंबर रघुनाथ सुतार (रा. फुलेवाडी), कामगार गजेंद्र रामदास शेठ (रा. बेकर गल्ली कोल्हापूर) व गौरव गणेश शेवडे (रा. न्यू शाहुपुरी कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

ख्रिसमसच्या पूर्व संध्येला व नववर्षाच्या स्वागताला बेकायदेशीर पार्टीचे आयोजन करणाऱ्या विरुद्ध पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सर्व पोलिस ठाण्यांना सूचना दिल्या होत्या. या नुसार मिळालेल्या माहितीनुसार उजळाईवाडी येथे एका कॅफेवर बेकायदेशीर दारू पार्टीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पथकासह आज पहाटेच्यासुमारास याठिकाणी छापा टाकला. यावेळी पार्टीत ६० ते ६५ पुरुष व ४० ते ४५ महिला होत्या. 

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलिस निरीक्षक सागर वाघ, सहा. फौजदार हरीश पाटील, खंडेराव कोळी, पो. हे कॉ. विलास किरोळकर, अमित सरजे, सचिन पाटील, संतोष पाटील, युवराज पाटील, प्रवीण पाटील, अमर अडूर्कर, सतीश पोवार, रणजित कांबळे, समीर कांबळे, सोम राज पाटील यांनी केली.

नागरिकांमधून समाधान 

विविध पार्टीचे या ठिकाणी आयोजन करण्यात येते रातभर डी जेच्या आवाजाने आजू बाजूच्या रहिवाश्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी होत्या. पोलिसांनी छापा टाकल्याने रहिवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: Illegal party organized, police action on cafe in Ujalaiwadi kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.