“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 12:18 PM2024-05-26T12:18:31+5:302024-05-26T12:18:41+5:30

BJP Chandrashekhar Bawankule Replied Sanjay Raut: ज्यांनी आयुष्यभर गटातटाचे राजकारण केले त्या संजय राऊतांना परिवार काय कळणार, अशी विचारणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

bjp chandrashekhar bawankule replied thackeray group mp sanjay raut over criticism on pm modi amit shah and devendra fadnavis | “२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे

“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे

BJP Chandrashekhar Bawankule Replied Sanjay Raut: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचे मतदान झाले असून, आता सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्यानंतर ०४ जून रोजी मतमोजणी आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे केले जात असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तीव्र होताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी केलेल्या एका दाव्यावरून भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला.

४ जूननंतर भाजपात मोदी-शाह यांना पाठिंबा राहणार नाही. नितीन गडकरींचा नागपूरात पराभव व्हावा यासाठी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपूरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपूरात उघडपणे बोलताना दिसतात, असा खळबळजनक दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊतांच्या त्यांच्या रोखठोक सदरातून हे भाष्य केले आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर पोस्ट करत संजय राऊतांवर पलटवार केला.

२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते

उबाठाचे अधिकृत आणि शरद पवार गटाचे स्वयंघोषित प्रवक्ते संजय राऊत यांनी पुन्हा अकलेचे तारे तोडत भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केले आहे. राऊत हे उद्धव ठाकरे यांचे कर्मचारी आहेत पण ते शरद पवार यांची चाकरी करतात. ते भ्रमिष्ट अवस्थेत रोखठोक लिहीत असावेत. भाजप हा पक्ष नाही तर परिवार आहे. ज्यांनी आयुष्यभर गटातटाचे राजकारण केले त्या संजय राऊतांना परिवार काय कळणार? आदरणीय पंतप्रधान मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या एकाच परिवारातील सदस्य आहेत. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हे मूल्य घेऊन भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता काम करतो. पण संजय राऊतांच्या बाबतीत प्रथम शरद पवार नंतर स्वतः आणि शेवटी उद्धव ठाकरे आणि उबाठा गट असा क्रम आहे. त्यामुळे राऊतांच्या डोक्यातून असेच काहीतरी बाहेर पडणार. २०१९ मध्ये स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी संजय राऊतांनीही प्रयत्न केले होते. पण त्यांचा डाव यशस्वी झाला नाही. हिंमत असेल तर एक ‘रोखठोक’ त्यावरही येऊ द्या!, असे आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

दरम्यान, संजय राऊतांच्या दाव्यावर काँग्रेसने जोरदार पलटवार केला आहे. मी कुणाचीही रसद घेण्याइतपत भिकार XX नाही. ९ व्यांदा निवडणूक लढतोय. तुम्हाला भाजपात भांडणे लावायचा धंदा दिलाय का? तुमचे नेमके काम काय आहे? महाविकास आघाडीतला एक पक्ष अशाप्रकारे विधाने करत असेल तर काँग्रेसने त्यांना समज द्यावी. मी वरिष्ठांना याविषयी पत्र लिहिणार आहे. हे लिहिण्यामागचा उद्देश काय, तुम्ही गडकरींच्या बाजूने होता का? संजय राऊत जे काही बोलतात, त्यांनी पुराव्यानिशी बोलावं, उगाच वायफळ बडबड करून प्रसिद्धीसाठी बोलू नये, अशा शब्दात नागपूरचे काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी संजय राऊतांचा दावा खोडून काढला.
 

Web Title: bjp chandrashekhar bawankule replied thackeray group mp sanjay raut over criticism on pm modi amit shah and devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.