Kolhapur: हिम्मत असेल तर थेट पाईपलाईनच्या चौकशीची मागणी विधिमंडळात करा, राजेश क्षीरसागर यांचे सतेज पाटलांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 19:28 IST2025-10-04T19:27:12+5:302025-10-04T19:28:33+5:30
अधिकाऱ्यांवर हक्कभंग करणार म्हटल्यावर माजी पालकमंत्र्यांना अधिकाऱ्यांचा की ठेकेदारांचा पुळका?

Kolhapur: हिम्मत असेल तर थेट पाईपलाईनच्या चौकशीची मागणी विधिमंडळात करा, राजेश क्षीरसागर यांचे सतेज पाटलांना आव्हान
कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळाचे कायदे मला शिकवू नयेत. जनतेच्या प्रश्नासाठी अधिकाऱ्यांवर हक्कभंग करणार म्हटल्यावर माजी पालकमंत्र्यांना अधिकाऱ्यांचा की ठेकेदारांचा पुळका आला आहे? अशी विचारणा करत आमदार सतेज पाटील यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी शहरवासीयांच्या माथी मारलेल्या गळक्या थेट पाईपलाईन योजनेच्या कामाच्या चौकशीची मागणी विधिमंडळात करावी, असे आव्हान राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी दिले.
क्षीरसागर यांचे एखादे-दुसरे काम केले नसल्यानेच ते अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणण्याची भाषा करत असल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी केली होती. त्यावर क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले.
पत्रकात म्हटले आहे की, निवडणुकीत रस्त्यांची वर्कऑर्डर झाली नाही, असा खोटा अपप्रचार करणारे सतेज पाटील तोंडघशी पडले. रस्त्यांच्या कामात दिरंगाई, दर्जा याबाबतच अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला गेला. पण, अधिकाऱ्यांचा आणि ठेकेदाराचा पुळका त्यांना आला आहे. ज्या पद्धतीने निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते, त्याच पद्धतीने १०० कोटींचे रस्ते करून घेण्याची धमक आमच्यात आहे. त्याची काळजी माजी पालकमंत्र्यांनी करू नये.
त्यापेक्षा येणाऱ्या दिवाळीत तरी थेट पाईपलाईनने व्यवस्थित अभ्यंगस्नान होईल का? याकडे लक्ष द्यावे. खासदार शाहू छत्रपती यांनी दिलेल्या सूचनाही अधिकारी डावलतात, असे आमदार पाटील मान्य करतात. मग अशाच अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिल्यास आमदार पाटील यांना अधिकाऱ्यांचा पुळका का आला?
मला जनतेने ३० हजारांच्या मताधिक्याने निवडून दिले आहे. त्यामुळे जनतेसाठीच काम करणे माझे कर्तव्य समजतो. पण मागच्या दरवाजाने निवडून येणाऱ्यांना जनतेचे प्रश्न काय कळणार? असा पलटवारही त्यांनी केला.