Kolhapur News: शक्तिपीठ महामार्गाचा हट्ट धरला तर.., संघर्ष समितीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 11:57 IST2025-12-01T11:55:43+5:302025-12-01T11:57:04+5:30
सरकार केवळ कंत्राटदाराचे भले करण्यासाठी महामार्ग होणार असल्याचे सांगत आहे. पण...

Kolhapur News: शक्तिपीठ महामार्गाचा हट्ट धरला तर.., संघर्ष समितीचा इशारा
कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदगडच्या सभेत शक्तिपीठ महामार्ग होणारच, असे म्हटले आहे, त्याचा शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीतर्फे निषेधच आहे. शक्तिपीठ महामार्गचा हट्ट धरला तर शेतकरी पुन्हा तीव्र आंदोलन सुरू करतील, असा इशारा संघर्ष समितीचे राज्य समन्वयक गिरीश फोंडे यांनी रविवारी प्रसिद्धी पत्रकातून दिला.
पत्रकात म्हटले आहे, बारा जिल्ह्यांसहित शिरोळ, हातकणंगले, कागल तालुक्यांतील लोकांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला आहे. रस्त्यासाठी जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना हाकलून लावले आहे. शेतकरी छातीचा कोट करून शक्तिपीठला विरोध करीत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महामार्ग होणार नाही.
वाचा- ‘शक्तिपीठ’ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
सरकार केवळ कंत्राटदाराचे भले करण्यासाठी महामार्ग होणार असल्याचे सांगत आहे. पण, महामार्ग कशासाठी हवा, याचे उत्तर सरकारने दिलेले नाही. बाधित शेतकऱ्यांनी गेल्या चार महिन्यांत एकाही गावात महामार्गसाठी संयुक्त मोजणी होऊ दिलेली नाही. तरीही सरकार शक्तिपीठ रेटण्याचा प्रयत्न करीत आहे. हा डाव शेतकरी हाणून पाडतील.