इचलकरंजीची साहित्य संपदा आपटे वाचन मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:35 AM2019-03-04T00:35:26+5:302019-03-04T00:35:31+5:30

अतुल आंबी । लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहराच्या साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात अनमोल योगदान देत वाचनसमृद्ध पिढी घडविण्याचे ...

Ichalkaranji's literature estate Apte read temple | इचलकरंजीची साहित्य संपदा आपटे वाचन मंदिर

इचलकरंजीची साहित्य संपदा आपटे वाचन मंदिर

Next

अतुल आंबी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहराच्या साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात अनमोल योगदान देत वाचनसमृद्ध पिढी घडविण्याचे काम येथील आपटे वाचन मंदिराने केले आहे. या वाचनालयाला पुढील वर्षी १५० वर्षे पूर्ण होणार आहेत. इचलकरंजीचे जहागीरदार श्रीमंत गोविंदराव आबासाहेब यांच्या प्रेरणेने रामभाऊ आपटे वकिलांनी सन १८७० साली नेटिव्ह जनरल लायब्ररी या नावाने हे वाचनालय सुरू केले.
इचलकरंजीची वाचनसमृद्धी दृढ करण्याच्यादृष्टीने जहागीरदार आबासाहेब यांनी या वाचनालयासाठी मखदुम पीर या देवस्थानातील नगारखान्याची जागा दिली. काही वर्षे या जागेत वाचनालय सुरू होते. वाचकांची व पुस्तकांची संख्या वाढल्यानंतर ही जागा अपुरी पडल्याने आपटे यांनी राजवाड्यासमोरील स्वत:च्या जागेत या वाचनालयाची इमारत बांधण्यास सुरुवात केली. मात्र, दुर्दैवाने त्यांच्या हयातीत इमारत पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी या इमारतीचे काम पूर्ण करून आपल्याकडील ग्रंथसंपदाही वाचनालयास भेट दिली. सन १८९६ साली या नव्या इमारतीत ग्रंथालयाचे स्थलांतर झाले. त्यावेळी आपटे यांचे वाचनालयाच्या उभारणीतील तन-मन-धनाने दिलेले योगदान पाहता या ग्रंथालयाचे सन १९१० साली आपटे वाचन मंदिर असे नामकरण करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळात जहागीरदारांच्या आश्रयाखाली वाचनालयाची भरभराट होत गेली. अनेक जुनी व दुर्मीळ पुस्तके, मौलिक ग्रंथ वाचनालयास मिळाली. सन १९५३ मध्ये ग्रंथालयाची रितसर बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अ‍ॅक्टखाली नोंदणी करून नवीन कार्यकारिणी अस्तित्वात आली.
या कार्यकारिणीनेही यशस्वी वाटचाल सुरू ठेवल्याने ग्रंथालयातील पुस्तकांची संख्या वाढत गेली. सन १९७८ साली झालेल्या पुस्तकांच्या परिगणनेमध्ये वीस हजार पुस्तकांची नोंद होती. तसेच शास्त्रीय पद्धतीने या पुस्तकांचे वर्गीकरण करण्यात आले. त्यानंतर कार्डेक्स पद्धतीचा अवलंब करण्यात आला. तेथून ग्रंथालयाचे स्वरूप पालटले. पुस्तकांच्या देव-घेव पद्धतीत बदल झाला. वाचकांना तत्पर सेवा मिळू लागल्याने आणखीन वाचकसंख्या वाढली आणि ग्रंथालयाला पुन्हा जागा कमी पडू लागली. शासनाच्या ताब्यातील इमारतीमुळे त्याठिकाणी पोस्ट आॅफिस होते. त्यामुळे इमारतीच्या हस्तांतरणासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू झाले. त्याला सन १९८३ साली यश मिळाले. त्यानंतर २५ मे १९८३ रोजी नव्या इमारतीची पायाभरणी झाली. गावातील नगरपालिका, विविध सहकारी संस्था, चॅरिटेबल ट्रस्ट व देणगीदार यांच्या सहकार्याने ७ एप्रिल १९८५ रोजी नव्या तीनमजली भव्य वास्तूचे उद्घाटन झाले. त्यानंतर निवडक व लोकप्रिय पुस्तकांची खरेदी होऊ लागली. पुस्तकांबरोबर साहित्यिकांची कथा-कथने, भक्तिगीते, नाटके यांच्या ध्वनिफितीही खरेदी केल्या. आजघडीला अतिशय समृद्ध अशा स्वरूपात हे वाचनालय सुरू आहे. गेली ३२ वर्षे या वाचनालयाचे ग्रंथपाल म्हणून आनंदा काजवे हे काम पाहत आहेत.
सध्याचे
संचालक मंडळ
अध्यक्ष - अ‍ॅड. स्वानंद कुलकर्णी, उपाध्यक्ष - अशोक केसरकर, सदस्य - संजय देशपांडे, हर्षदा मराठे, प्रा. अशोक दास, उदय कुलकर्णी, सुषमा दातार, माया कुलकर्णी, कुबेर मगदूम, चंद्रशेखर शहा, दीपक होगाडे, जयप्रकाश शाळगावकर, काशिनाथ जगदाळे, सुजित सौंदत्तीकर.
४० वर्षे अखंडित व्याख्यानमाला
सन १९७० साली ग्रंथालयास शंभर वर्षे पूर्ण झाली. त्यावेळेपासून गेली ४० वर्षे अखंडितपणे प्रत्येक वर्षी वसंत व्याख्यानमाला घेतली जाते. त्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक लेखक, कवी, समीक्षक, व्यासंगी, रंगभूमी, अर्थतज्ज्ञ अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांची व्याख्याने झाली आहेत. इचलकरंजीच्या सांस्कृतिक चळवळीतील तो एक अविभाज्य भाग बनला आहे.
ग्रंथालयाची ५ हजार ८४७ सभासद संख्या
वाचनालयाचे एकूण पाच हजार ८४७ सभासद आहेत. त्यामध्ये आजीव सभासद १२६१, साधारण सभासद तीन हजार ४८५ व बाल सभासद ११०१ यांचा समावेश आहे.
विविध उपक्रम
ग्रंथालयाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. तसेच विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. आदर्श शिक्षकांची निवड करून त्यांचा गौरव केला जातो. गुढीपाडवा आणि दीपावली पाडवानिमित्त स्वरप्रभात व स्वर दीपोत्सव कार्यक्रम घेतले जातात. ग्रंथ प्रदर्शन, वाचन प्रेरणा दिन यासह करमणुकीचे कार्यक्रम राबविले जातात.
ग्रंथालयाकडे ८९ हजारांवर पुस्तके
ग्रंथालयाकडे ८९ हजार ७०५ पुस्तके आहेत. त्यामध्ये अनेक दुर्मीळ ग्रंथ, ऐतिहासिक पुस्तके, संशोधनात्मक निबंध, मुलांचा सांस्कृतिक कोश, विश्वकोशाचे विविध खंड, विवेकानंद ग्रंथावली, स्पिरीट आॅफ इंडिया, प्राचीन धार्मिक ग्रंथ, मराठी रियासत, महात्मा गांधी चरित्र, नकाशे, गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड, मराठी वाङ्मय कोश, एनसायक्लोपीडीया ब्रिटानिका, आदी महत्त्वाची ग्रंथसंपदा वाचनास उपलब्ध आहे.

Web Title: Ichalkaranji's literature estate Apte read temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.