इचलकरंजी, शिरोळमध्ये मुस्लिम आरक्षणासाठी मोर्चे

By Admin | Updated: January 24, 2015 00:08 IST2015-01-24T00:03:01+5:302015-01-24T00:08:05+5:30

वेगवेगळ्या मुस्लिम संघटनांचे आंदोलन : मोर्चांना मोठा प्रतिसाद; जोरदार घोषणा

Ichalkaranji, Shirol for the Muslim reservation | इचलकरंजी, शिरोळमध्ये मुस्लिम आरक्षणासाठी मोर्चे

इचलकरंजी, शिरोळमध्ये मुस्लिम आरक्षणासाठी मोर्चे

इचलकरंजी : मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी येथील जमाते उलेमा-ए-हिंद यांच्यावतीने आज, शुक्रवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्यावतीने प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, मुस्लिम समाजाच्या अन्य दोन संघटनांनीही त्याचवेळी आपापली निवेदने प्रांताधिकाऱ्यांना दिली.
मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जमाते उलेमा-ए-हिंद या संघटनेच्यावतीने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसील कार्यालयांवर त्या-त्या भागातील मुस्लिम समाजातील नागरिकांना घेऊन मोर्चा काढण्यात आला. याचाच एक भाग म्हणून इचलकरंजीतील चॉँदतारा मस्जिद येथून अध्यक्ष हाफिज मुसा सनदी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरून हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर आला. याठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. त्यानंतर शिष्टमंडळाने प्रांताधिकारी जिरंगे यांना भेटून आरक्षण मिळण्यासंबंधी निवेदन दिले.
यावेळी मौलाना महंमद अली, हाफिज मिस्त्री, मुफ्ती फिरोज, हाफिज इनायत, मौलाना युनूस, मख्दुम जमादार, आदींसह मुस्लिम समाजातील नागरिक सहभागी झाले होते.
शिरोळ : मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, तसेच मुस्लिम अत्याचार विरोधी कायदा मंजूर करावा, या प्रमुख मागणीसाठी शिरोळ तालुका जमियत उलमा ए हिंद शाखेच्यावतीने आज, शुक्रवारी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल यादव, जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक, ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीपराव पाटील, रामभाऊ डांगे, दलितमित्र अशोकराव माने, भवानीसिंग घोरपडे, आदींनी आंदोलनास पाठिंबा दिला. मोर्चाचे नेतृत्व मुस्लिम समाजाचे फारुक पठाण, चंगेजखान पठाण, बाळासो शेख यांनी केले.
अब्दुललाट : मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी येथील मुस्लिम सुन्नत जमात यांच्यावतीने गावचावडीवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात दादासाहेब सांगावे, कुसुम परीट, शानाबाई कोळी, मारुती मोहिते, पोपट कुरणे, मोहन कांबळे, सागर सांगले, सुनील सावंत, आदींनी मनोगत व्यक्त केले.

Web Title: Ichalkaranji, Shirol for the Muslim reservation