मी खंबीर, धमकीला भीक घालत नाही - इंद्रजित सावंत; मुख्यमंत्र्यांना केले आवाहन, म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 11:55 IST2025-02-26T11:55:09+5:302025-02-26T11:55:39+5:30
कोल्हापूर : इतिहासाच्या मांडणीवरून मला प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने धमकी दिली असली तरी अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. ...

मी खंबीर, धमकीला भीक घालत नाही - इंद्रजित सावंत; मुख्यमंत्र्यांना केले आवाहन, म्हणाले..
कोल्हापूर : इतिहासाच्या मांडणीवरून मला प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने धमकी दिली असली तरी अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. माझे संरक्षण करण्यास मी समर्थ असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा व्यक्तीवर कारवाई करून आपण सर्व समाजाचे आहोत, असा संदेश द्यावा, असे आवाहन इतिहास संशोधक डॉ. इंद्रजित सावंत यांनी मंगळवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केले.
डॉ. सावंत म्हणाले, सोमवारी रात्री १२ वाजता मला कोरटकर नावाच्या व्यक्तीचा फोन आला. ती व्यक्ती शिव्या देत जातीवाचक बोलत होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख त्याने केला असून हा महाराष्ट्र पेशव्यांचा हाेत आहे का, असा सवाल डॉ. सावंत यांनी केला. संभाजी महाराज यांचा इतिहास मी कसा बदलू. इतिहासाचे दाखले ब्रिटिश काळापासून आहेत. खोटा व घाणेरडा इतिहास सांगावा, अशी त्यांची इच्छा आहे. पण, खोटा इतिहास आम्ही का सांगू, असेही सावंत म्हणाले.
गृहमंत्री काय करतात
मला आलेल्या धमकीचा मुद्दा नाही, पण छत्रपती शिवरायांवर असे कुणी बोलत असेल आणि नंतर ते म्हणणार असतील की मी असे बोललो नाही, तर महाराष्ट्राचे गृहमंत्री काय करतात, असा सवालही डॉ. सावंत यांनी उपस्थित केला.
मला अशा धमक्या नवीन नाहीत, पण कोरटकरचे शिवरायांबद्दलचे विचार किती घाणेरडे आहेत, यांच्या पोटात शिव छत्रपतींबद्दल काय विष भरलेले आहे हे बहुजनांना समजावे म्हणून हे रेकार्डिंग व्हायरल केले आहे. - इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक, कोल्हापूर.
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत हीन विचार करणारी विषवल्ली या राज्यात राहते हीच बाब धक्कादायक आहे. सामाजिक दरी वाढविण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या अशा माथेफिरू लोकांना कुणीही पाठीशी घालू नये. शासनाने कोरटकरवर कठोर कारवाई करावी. - संभाजीराजे, माजी खासदार
प्रशांत कोरटकरसारख्या राजकीय गुंडांना अभय मिळत असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणाऱ्या या प्रवृत्ती मोकाट सुटल्या आहेत. या परिस्थितीत राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक आहे का, की सरकारच या गुंडगिरीला पाठबळ देत आहे? सरकारने या प्रकरणात लक्ष घालून वेळीच बंदोबस्त करावा; अन्यथा शिवप्रेमी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. -आमदार सतेज पाटील, काँग्रेसचे गटनेते, विधानपरिषद