Kolhapur Crime: ..अन् पतीनेच केला पत्नीचा खून, मडिलगेतील दरोड्याच्या बनावाचे कसं फुटलं बिंग.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 12:47 IST2025-05-20T12:47:08+5:302025-05-20T12:47:48+5:30
गुण्यागोविंदाने चाललेला संसार उद्ध्वस्त

Kolhapur Crime: ..अन् पतीनेच केला पत्नीचा खून, मडिलगेतील दरोड्याच्या बनावाचे कसं फुटलं बिंग.. वाचा
आजरा : मडिलगे (ता. आजरा) येथे रविवारी पडाटे दरोडा पडलाच नव्हता. पत्नीचा खून पचविण्यासाठी पतीनेच दरोड्याचा बनाव रचला होता. मात्र मृतदेहावरच्या दागिन्यांनी, त्याने सांगितलेली हकिकत आणि घटनास्थळावरील परिस्थिती यातील विसंगती पाहून पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी फिर्यादी पतीचीच चौकशी सुरू केली.
पोलिसी खाक्याही दाखविला तरीही बधत नाही म्हटल्यावर दीड वर्षाच्या लेकरांचा व वृद्ध आईचे काय होणार, असे विचारताच भावनावश होऊन त्याचा निर्धार ढासळला आणि त्याने पत्नीचा खून आपणच केल्याची कबुली दिली. पोलिसांनी संशयित आरोपी पती, मडिलगेचा माजी उपसरपंच सुशांत सुरेश गुरव याला अटक केली आहे.
वाचा- आई कुणा म्हणू मी..; आई गेली देवाघरी, बापाची जेलवारी
मडिलगे (ता. आजरा) येथील पूजा सुशांत गुरव यांच्या खुनाचा तपास आजरा पोलिस व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २४ तासात उघड केला आहे. संशयित आरोपीला मंगळवारी न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले व सहायक पोलिस निरीक्षक नागेश यमगर यांनी दिली.
वाचा - महाराज.. हे काय केलं तुम्ही!, मडिलगेतील खुनाच्या उलगड्यानंतर पंचक्रोशी झाली सुन्न
रविवारी पहाटे २.३० वाजता घरात दरोडा पडला असून, दरोडेखोरांनी पत्नीचा धारदार हत्याराने खून केला तसेच सोने व रोख रक्कम लंपास केल्याची फिर्याद सुशांत गुरव याने आजरा पोलिसांत दिली होती. त्याआधारे पोलिसांचा तपास सुरू होता. घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. सोमवारी सकाळी संशयिताकडे दीड वर्षाच्या मुलाबाबत सहानुभूतीने विचारणा करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
कर्ज फेडण्यासाठी दागिने न दिल्यानेच खून
कर्जाची परतफेड करण्यासाठी तुझे दागिने गहाण ठेवायला दे, अशी मागणी संशयिताने पूजाकडे केली. पूजाने दागिने देण्यास नकार देताच दोघांमध्ये वादावादी झाली. यातूनच सुशांतने दगड व खोऱ्याने पूजाच्या डोक्यात गंभीर वार केले. यात ती जागीच ठार झाली . हा खून पचविण्यासाठी संशयिताने दरोड्याचा बनाव केला; मात्र हा बनाव पोलिसांनी २४ तासात उघड केला. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक नागेश यमगर करीत आहेत.
गुण्यागोविंदाने चाललेला संसार उद्ध्वस्त
संशयित आचारी, कीर्तनकार व पौरोहित्याचे काम करीत होता. त्यांनी बारामतीच्या डॉक्टरांकडे १२ फेऱ्या मारल्यानंतर सोपान व मुक्ता ही दोन जुळी मुले झाली. संसार चांगला चाललेला असताना रागाने केलेल्या मारहाणीत पूजाचा मृत्यू झाला आणि संसार उद्ध्वस्त झाला.
अन् संशयाची सुई फिर्यादीकडे वळली
फिर्याद देताना आरोपीने दरोडेखोरांनी पत्नी पूजाच्या डोक्यात रॉडने वार केल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात धारदार हत्याराने वार केल्याचे पोलिसांना आढळले. दागिने दरोडेखोरांनी नेले असे म्हटले होते. मात्र मृतदेहाच्या मंगळसूत्र, बांगड्या अंगावर तसेच कपाटातील दागिने जसेच्या तसे होते. साड्या विस्कटल्या होत्या, मात्र त्यावर जखमांचे रक्त पडलेले नव्हते. या विसंगतीमुळेच पोलिसांच्या संशयाची सुई फिर्यादी पतीवर गेली आणि या खुनाचा छडा लागला.
हत्यार फेकले गोबर गॅसमध्ये
खोऱ्याने पूजाच्या डोक्यात गंभीर वार करू तिला रक्ताच्या थारोळ्यात घरातच टाकले व वापरलेले हत्यार संशयिताने गोबर गॅसमध्ये नेऊन टाकले.