कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस; ‘पंचगंगा’ पुन्हा पात्राबाहेर, ५० बंधारे पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 12:40 IST2025-07-04T12:39:43+5:302025-07-04T12:40:13+5:30
दिवसात दहा इंच पाणीपातळीत वाढ

कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस; ‘पंचगंगा’ पुन्हा पात्राबाहेर, ५० बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर : शहर आणि परिसरात गुरुवारी दिवसभर ऊन, पाऊस असे चित्र राहिले. सकाळच्या टप्प्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. दुपारी अडीच, तीनच्या सुमारास ऊन होते. सर्वत्र धरण क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने पंचगंगा नदीतीलपाणी पुन्हा एकदा पात्राबाहेर पडले. पाण्याची वाढ इशारा पातळीच्या दिशेने सुरू आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणे, नदीतीलपाणीपातळी वाढली आहे. एकूण ५० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बंधाऱ्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.
दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. तळकोकण, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धो, धो पाऊस कोसळत आहे. यामुळे चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, आजरा तालुक्यातील आंबेओहोळ, सर्फनाला, गडहिंग्लज तालुक्यातील येणेचवंडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धामणीचे धरण नव्वद टक्के भरले आहे. सर्वच मोठी, मध्यम, लघू धरणे पन्नास टक्क्यांवर भरली आहेत.
कोयना धरणात ५८.८१ टीएमसी पाणीसाठा आहे. ३३ हजार २८६, तर जावक १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आलमट्टी धरणात ८८.१२० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. ९३ हजार ९६३ क्सुसेक आवक, तर एक लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग आहे.
धामणी नदीपात्रात पाणीपातळी वाढणार
धामणी धरण ९० टक्के भरले आहे. गुरुवारी रात्री किंवा आज, शुक्रवारी सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. त्यामुळे धामणी नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे, धरण क्षेत्रात पर्यटनास येऊ नये, असे आवाहन पाटबंधारे प्रशासनाने केले आहे.
वारणा धरणातून विसर्ग वाढवला..
वारणा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. परिणामी धरणातील पाणीपातळी सांडवा पातळीवर आली आहे. पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून येत्या चोवीस तासांत वक्र दरवाजातून २८४० क्युसेकपर्यंत आणि विद्युतगृहास १६६० क्युसेक असा एकूण ४५०० क्युसेकपर्यंत पाणी वारणा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे, अशी माहिती वारणा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता बी. आर. पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकातून दिली.
दिवसात दहा इंच पाणीपातळीत वाढ
पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर गुरुवारी पहाटे चार वाजता ३१.४ इंच पाणीपातळी होती. सायंकाळी पाच वाजता ३१.११ इंच पाणीपातळी राहिली. इशारा पातळी ३९ फुटांवर आहे. त्या दिशेने पुन्हा एकदा पाणी वाढत आहे.