कोल्हापुरात रेणुका देवी मिरवणुकीत जोरदार हाणामारी, दोन तास मानाचे जग थांबून
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 12:26 IST2025-08-12T12:26:29+5:302025-08-12T12:26:49+5:30
पोलिस मध्यस्थीनंतर बंदोबस्तात मिरवणूक मार्गस्थ

कोल्हापुरात रेणुका देवी मिरवणुकीत जोरदार हाणामारी, दोन तास मानाचे जग थांबून
कोल्हापूर : रेणुका देवीच्या जगांची मिरवणूक पुढे नेण्यावरून सोमवारी दोन गटात जोरदार वादावादी झाली. आमच्याच जगाचा मान आधी यावरून दोन्ही गट हट्टाला पेटले अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने वाद मिटला व पुढे पोलिस बंदोबस्तातच मिरवणूक मार्गस्थ झाली. या गोंधळामुळे मिरवणुकीला दोन ते अडीच तास उशीर झाला.
श्रावणातील तिसऱ्या सोमवारी श्री रेणुका देवीच्या जगांना पंचगंगा नदी घाटावर स्नान घातले जाते. त्यानंतर वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. सोमवारी दुपारी ३ नंतर ओढ्यावरच्या रेणुका मंदिरातून देवीची पालखी शांताबाई सोनाबाई जाधव, रविवार पेठेतला बायकाबाई चव्हाण, गंगावेश येथील लक्ष्मीबाई जाधव यांचा जग आणि रेणुकानगर पाचगाव मंदिरातील देवीची पालखी आणि बेलबागेतील आळवेकर जग असे मानाचे जग आले.
पूजा विधी झाल्यानंतर शुक्रवार पेठेतील पंचगंगा तालीम येथे बेलबाग येथील आळवेकर जग व पालखी पुढे आली पण ओढ्यावरील मंदिरातील जग तिथेच थांबला. येथे जग पुढे नेण्यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला. त्याचे पर्यावसान वादात आणि धक्काबुक्कीत झाल्याने माेठा तणाव निर्माण झाला.
तब्बल २ तास मानाचे जग जागेवरच थांबले. शाहुपूरी पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केले. सायंकाळी साडेपाचनंतर ओढ्यावरील जग पुढे मार्गस्थ झाला. त्यानंतर तणाव निवळला. यानंतर सर्व मानाचे जग पापाची तिकटी-गुजरी मार्गे भवानी मंडप येथे पोहोचले. येथे तुळजाभवानी देवीची भेट होऊन जग आपआपल्या ठिकाणी मार्गस्थ झाले.