Kolhapur Accident: रोज 'वडाप'नं खाऊ घेऊन येणारी आजी शववाहिकेनं आली, नातवांनी हंबरडा फोडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 13:09 IST2025-10-15T13:08:14+5:302025-10-15T13:09:28+5:30
आजीचा मृतदेह पाहून तिघा नातवांचा हबरडा हृदय पिळवटून टाकणार होता

Kolhapur Accident: रोज 'वडाप'नं खाऊ घेऊन येणारी आजी शववाहिकेनं आली, नातवांनी हंबरडा फोडला
सरदार चौगुले
पोर्ले तर्फ ठाणे : दूध-दह्याचा बाजार करून आजी रोज सायंकाळी नातवांसाठी न विसरता बुटीतून खाऊ आणायची; पण आज सायंकाळी नातवांना बुटी घेऊन चालत येणारी ना आजी दिसली, ना बुटीत खाऊ दिसला. मंगळवारी आजी बुटी घेऊन आलीच नाही, तर ती शववाहिकेच्या गाडीतून आली. आजीचा मृतदेह पाहून तिघा नातवांचा हबरडा हृदय पिळवटून टाकणार होता. अपघातात आजीचा मृत्यू झाल्याने तिच्या आठवणीने नातवंडांचा जीव कासावीस झाला आहे.
आसुर्ले (ता. पन्हाळा) येथील सुशीला कृष्णात पाटील (वय ५६) या महिलेचा मंगळवारी सकाळी कोल्हापुरातील गंगावेश बाजारपेठेत नियंत्रण सुटलेली वडाप गाडी घुसल्याने झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. गेल्या तीस वर्षांपासून त्या दूध-दही विक्रीचा नियमित व्यवसाय करत होत्या. एक वेळ देवाचे फूल चुकेल; पण त्यांनी आपल्या व्यवसायात खंड पाडला नाही. कोरोना असू दे की पूर येऊ दे, पण कोल्हापूरला दूध-दही घेऊन जायच्या थांबल्या नाही. कारण दह्या-दुधावर मोठ्या कष्टाने प्रपंच उभारला होता.
वाचा- रिक्षाचालक मोटार चालवायला गेला अन् नियंत्रण सुटून महिलेचा जीव गेला; कोल्हापुरातील गंगावेशमध्ये भाजीमंडईत भीषण अपघात
गोठ्यातील चार जनावरांना त्यांनी घरची लक्ष्मी मानलं होते. त्यांच्या दुधावर हे सारं चालत असल्याने सकाळी बाहेर पडण्यापूर्वी कामाच्या जोडण्या करूनच कोल्हापूरला जायच्या. व्यवसायामुळे जनावरांची उगानिघा करायला मिळत नसली तरी जनावरांची त्यांना काळजी होती. कुटुंबाचे आणि जनावरांची वात्सल्यासारखी काळजी घेणाऱ्या सुशीला यांच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नातीला ऑफिसर होताना बघायचे राहून गेले
सुशीला यांचे तीन नातवांवर खूप प्रेम होते. आरोही नात आजीची कायम सावली बनून आजूबाजूला असायची. आजीच्या हाताने जेवायची आणि तिच्या कुशीतच झोपायची. आरोही हुशार असल्याने तिला ऑफिसर झाल्यावरच माझे डोळे मिटावेत, अशी ती नेहमी म्हणायची; पण नियतीच्या मनात वेगळे असल्याने तत्पूर्वीच आजी मला सोडून गेल्याची आठवण सांगताना तिला रडू कोसळले.
डोक्यावरच्या बुटीने प्रपंच चालविला
गेल्या तीस वर्षांपासून दूध-दह्याचा व्यवसाय करणाऱ्या सुशीला आजीने वीस वर्षे कोल्हापुरातील सोन्या मारुती चौक, शाहूपुरी, मार्कट यार्ड, तावडे हॅाटेल, ताराबाई पार्क आणि गंगावेश परिसरात फिरून दूध-दही विकले. शरीरयष्टीमुळे चालणे होत नसल्याने आजी दहा वर्षांपासून गंगावेश येथील बाजारपेठेत बसून दूध-दही विकत होत्या. डोक्यावर बुटी घेतली तरच त्यांना चालता येत होते. डोक्यावरच्या बुटीने प्रपंच चालविला, शिवाय चालण्याचे बळ दिले; पण ते बळ फार काळ टिकले नाही.
डबा राहू दे करंज्या करा
दिवाळी सण जवळ आल्याने सर्वत्र दिवाळीचा फराण करण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी दिवाळीचा बाजार केला होता. त्यामुळे जेवण करून सून कधी करंज्या करणार म्हणून सुनेला त्रास न देता मंगळवारी सकाळी स्वत:च शिरा करून डबा भरला आणि सुनेला सांगितले आज जेवण नको डबा घेऊन जातो. तोच डबा खाण्याअगोदर त्यांच्यावर काळाने झडप घातली.