कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. कोणताही प्रकल्प राबविताना समर्थन आणि विरोध होत असतो. पण शक्तिपीठा महामार्गाबाबत चर्चेतून मार्ग काढण्याची शासनाची मानसिकता असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.उपमुख्यमंत्री पवार हे शुक्रवारी सायंकाळी कराड येथील लग्न समारंभास उपस्थित राहण्यासाठी कोल्हापूर विमानतळावर आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यात शक्तिपीठ महामार्गाला बागायत शेती जात असल्याने शेतकऱ्यांचा विरोध आहे. काही शेतकऱ्यांनी समर्थनही दर्शविले आहे. पण ज्यांचा विरोध आहे, त्यांना विश्वासात घेऊन चर्चेतून मार्ग काढण्याची सरकारची मानसिकता आहे.सुशील केडिया यांच्याबद्दल विचारले असता, ते म्हणाले, सुशील केडिया यांनी मूळ वक्तव्य कशावरून केले हे मला माहिती नाही. प्रत्येक राज्याची मातृभाषा आहे, ती आलीच पाहिजे. पण मुंबईमध्ये व्यवसायासह इतर कारणांसाठी वेगवेगळे भाषिक येत असतात. त्यांना लगेच मराठी येत नसेल तर त्या विषयाला किती महत्त्वाचे द्यायचे? एवढा गवगवा करण्याची गरज काय? असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, माजी आमदार राजेश पाटील, शहराध्यक्ष आदिल फरास आदी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री शिंदेंचे भाषण ऐकलेच नाहीकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत पुण्यातील दोन कार्यक्रमांना आपण उपस्थित हाेतो. कराडला लग्नसमारंभ असल्याने अमित शाह यांची परवानगी घेऊन इकडे आलो. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलले हे मला माहीत नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
‘शक्तिपीठ’बाबत चर्चेतून मार्ग काढण्याची सरकारची मानसिकता - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 19:28 IST