कोल्हापुरात गुंडांनी कॉलर पकडून पोलिसाला केली धक्काबुक्की, रस्त्यात वाढदिवस करण्यावरून हटकल्याने घडला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 15:51 IST2025-10-16T15:44:37+5:302025-10-16T15:51:53+5:30
कॉलर पकडून धक्काबुक्की, तिघांना अटक

कोल्हापुरात गुंडांनी कॉलर पकडून पोलिसाला केली धक्काबुक्की, रस्त्यात वाढदिवस करण्यावरून हटकल्याने घडला प्रकार
कोल्हापूर : रस्त्यात लावलेल्या दुचाकीवर केक ठेवून आरडाओरडा करीत वाढदिवस साजरा करणाऱ्यांना हटकल्याच्या रागातून तीन सराईत गुंडांनी पोलिसांवर हल्ला केला. पोलिस हवालदार पंढरीनाथ इश्राम सामंत यांची कॉलर पकडून गुंडांनी धक्काबुक्की केली. हा प्रकार सोमवारी (दि. १३) मध्यरात्रीच्या सुमारास लक्षतीर्थ वसाहतीमधील शाहू चौकात घडला.
हवालदार सामंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लक्ष्मीपुरी पोलिसांनी सराईत गुंड सादिक मोहम्मद पाटणकर (वय २०), अवधूत पिराजी गजगेश्वर (१९) आणि आदित्य राहुल भोजणे (२२, तिघे रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. फिर्यादी सामंत यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री ते सहकारी सौरव कोळी यांच्यासोबत लक्षतीर्थ वसाहत येथे गस्त घालण्यासाठी दुचाकीवरून गेले होते.
शाहू चौकात काही तरुण रस्त्यात मध्येच दुचाकी लावून आदित्य भोजणे याचा वाढदिवस साजरा करीत होते. दुचाकीवर केक ठेवून आरडाओरडा करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी हटकले. रस्त्यात वाढदिवस साजरा करू नका, असे सांगताच सादिक पाटणकर, अवधूत गजगेश्वर आणि भोजणे हे शिवीगाळ करीत पोलिसांच्या अंगावर धावून गेले. यातील पाटणकर याने हवालदार सामंत यांच्या शर्टची कॉलर पकडून धक्काबुक्की केली.
भर चौकात गुंडांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा आणि कॉलर पकडण्याचा प्रकार घडल्याने सामंत यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तिन्ही हल्लेखोरांना अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्यांची पोलिस कोठडीत रवानगी झाली.
तिघेही सराईत
अटकेतील तिघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर मारामारी, धमकावणे, सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणे, जीवघेणा हल्ला करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत मजल
भर चौकात पोलिसाची कॉलर पकडून त्यांच्यावर हल्ला करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली आहे. त्यामुळे पोलिसांचा धाक कमी झाला आहे काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गुंडांवर ठोस कारवाई करून पोलिसांनी वर्दीचा धाक वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.