कोल्हापूर : गुणवत्तेला आधुनिकतेची जोड देत ‘गोकुळ’ने गुजरात बाजारपेठेत दिमाखदार पदार्पण केले आहे. ‘सिलेक्ट’, ‘ट्रेट्रा पॅक’ दूध हिम्मतनगर व अहमदाबाद येथील मॉलमध्ये विक्रीस ठेवले आहे. बाजारपेठेतील ‘अमूल’च्या वर्चस्वाला शह देत ‘गोकुळ’ने आपली नेहमीची बाजारपेठ स्थिर ठेवत गुजरातमध्ये प्रवेश केला. कोल्हापूरच्या कसदार मातीतील सकस हिरव्या वैरणीबरोबर महालक्ष्मी पशुखाद्याचे विविध प्रकार जनावरांच्या आहारात असल्याने गोकुळच्या दुधाला एक वेगळा स्वाद व गुणवत्ता आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, रत्नागिरी, सांगलीबरोबर गोव्यातील ग्राहकांनाही ‘गोकुळ’च्या दुधाने भुरळ घातली आहे.
याबाबत, ‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे म्हणाले,
अतिरिक्त दुधाचा रूपांतर खर्च जास्त असतो, हा खर्च कमी करण्यासाठी जास्तीत-जास्त बाजारपेठा काबीज करणे गरजेचे आहे. ‘गोकुळ’ दुधाची गुणवत्ता व दर्जेदारपणामुळे ग्राहकांची मागणी असल्याने आगामी काळात संपूर्ण देशात ‘गोकुळ’चे दूध उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. हे सगळे करताना दूध उत्पादक शेतकरी, दूध संस्था, वितरक व कर्मचाऱ्यांचे योगदान खूप मोलाचे राहणार आहे.
फोटो ओळी : ‘गोकुळ’च्या ‘सिलेक्ट’, ‘ट्रेट्रा पॅक’ दुधाची गुजरातमधील हिम्मतनगर व अहमदाबाद येथे विक्री सुरू झाली आहे. (फोटो-२७०१२०२१-कोल-गुजरात)