कोल्हापूर जिल्हा बँकेपाठोपाठ ‘गोकुळ’चे चार संचालक वाढणार; इच्छुकांच्या आशा पल्लवीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 12:20 IST2025-07-14T12:18:09+5:302025-07-14T12:20:43+5:30
..म्हणून जागा वाढवण्याचा निर्णय घेतला

कोल्हापूर जिल्हा बँकेपाठोपाठ ‘गोकुळ’चे चार संचालक वाढणार; इच्छुकांच्या आशा पल्लवीत
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेपाठोपाठ ‘गोकुळ’ दूध संघाच्या संचालक मंडळाची संख्या २१ वरून २५ होणार आहे. उद्या, मंगळवारच्या संचालक मंडळाच्या सभेत निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर आगामी सर्वसाधारण सभेत मंजुरी घेऊन शासनाकडे पाठवला जाणार आहे. ‘गोकुळ’साठी इच्छुकांची संख्या पाहून जास्तीत जास्त इच्छुकांना संधी देण्याचा यातून प्रयत्न आहे.
‘गोकुळ’च्या सत्तेत जाण्यासाठी सगळेच आसुलेले आहेत. मागील निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांची ३० वर्षांची सत्ता घालविण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच नेते एकवटले होते. त्यातून सत्तांतर करण्यात यश आले, पण चार वर्षांनंतर सत्तारूढ गटातच मतभेद वाढले. त्याचे पडसाद अध्यक्ष निवडीवर पडले. आमदार सतेज पाटील यांचे समर्थक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर यांना बाजूला करून नविद मुश्रीफ यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. त्यानंतर, ‘गोकुळ’च्या राजकारणाने गती घेतली आहे.
ठराव गोळा करण्यास अजून कालावधी असताना ज्या पद्धतीने साम, दाम, दंड नीतीचा वापर सुरू आहे. ते पाहता, आगामी निवडणुकीत काटा लढत होणार हे लक्षात येते. उमेदवारीवरूनही सत्तारूढ व विरोधी गटात रस्सीखेच राहणार आहे. महायुती एकसंध राहिली तर उमेदवारी देताना त्यांची दमछाक होणार आहे. त्यामुळेच संचालक मंडळाची जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वसाधारण जागा १६ वरून २० होणार
‘गोकुळ’चे संचालक मंडळात २१ पैकी १६ जागा सर्वसाधारण गटातील तर पाच राखीव गटातील आहेत. वाढीव चारही जागा सर्वसाधारण गटात वाढणार आहेत.
‘केडीसीसी’च्या चार जागा वाढल्या
केडीसीसी बँकेने दोन वर्षांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाची संख्या २५ केली. यामध्ये दूध संस्था गटात एक, प्रक्रिया संस्था गटात १ तर इतर संस्था गटात २ जागा वाढवल्या आहेत. प्रक्रिया गटावर बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी न्यायालयात दाद मागितली आहे.