जयसिंगपूर : शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्यासाठी जागा आरक्षित करण्यात आलेली आहे. तथापि ही जागा जयसिंगपूर नगरपालिकेकडे हस्तांतरित करून राज्य शासनास नगरपालिकेला भरावी लागणारी २ कोटी २५ लाख रुपयांची रक्कम माफ करण्यात यावी व तातडीने ही जागा नगरपालिकेकडे वर्ग करून सुसज्ज असे ग्रंथालय, म्युझियम व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव विकास खारगे व राज्याचे महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडे केली आहे.
सन १९७३ साली स्व. डॉ. एस. के. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी फौंडेशनची स्थापना करून जागा आरक्षित केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पुतळा बसविण्यासंदर्भात शिवप्रेमी आग्रही असून नगरपालिकेने सदर जागा हस्तांतरित करण्यासाठी शासनास भरावी लागणारी रक्कम माफ करण्यासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार केला असून, याबाबत तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे.
यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव खारगे व महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव करीर यांनी याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून सत्वर सादर करून शासनाकडून लवकरच उचित कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबरोबरच म्युझियम व सुसज्ज ग्रंथालय होणार असल्याने जयसिंगपूर नगरीसाठी हा ऐतिहासिक निर्णय होणार आहे. यावेळी जयसिंगपूर नगरपालिकेचे नगरसेवक शैलेश चौगुले, विश्वास कोळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो - २९०१२०२१-जेएवाय-०८
फोटो ओळ - जयसिंगपूर येथील आरक्षित जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी परवानगी मिळावी, अशा मागणीचे निवेदन माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्य सचिव विकास खारगे व महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर यांना दिले. यावेळी शैलेश चौगुले, विश्वास कोळी उपस्थित होते.