Kolhapur: शाळेत जातो म्हणून बाहेर पडलेल्या मुलीने संपविले जीवन, कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 19:50 IST2025-08-09T19:49:53+5:302025-08-09T19:50:24+5:30
घटनेमुळे कोडुलकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला

Kolhapur: शाळेत जातो म्हणून बाहेर पडलेल्या मुलीने संपविले जीवन, कारण अस्पष्ट
इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथील एका १५ वर्षीय शाळकरी मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मीनाक्षी जनार्दन कोडुलकर (रा. चिंतामणी मंदिर जवळ, कोरोची) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. याबाबतची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झाली आहे.
मीनाक्षी शुक्रवारी सकाळी शाळेला जातो म्हणून घरातून निघाली होती. तिचे वडील जनार्दन कोडुलकर हे स्क्रॅप खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. ते पत्नी पूजा यांना सोबत घेऊन कामानिमित्त घराबाहेर गेले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास आई पूजा कोडुलकर या कामावरून जेवणासाठी घरी परतल्या असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला.
त्यांनी आत जाऊन पाहिले असता वरच्या मजल्यावरील खोलीत मीनाक्षीने छताच्या लोखंडी पाइपला साडी बांधून गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पती जनार्दन यांना फोन करून ही माहिती दिली.
त्यांनी शहापूर पोलिसांना कळवले. पोलिसांनी पंचनामा केला. पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली. परंतु मीनाक्षीने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी शहापूर अधिक तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे कोडुलकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मीनाक्षी हिच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे.