कोल्हापूर जिल्ह्यातील ३५७ प्राथमिक शाळांसाठी ११० कोटींचा निधी, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 17:21 IST2025-06-24T17:20:29+5:302025-06-24T17:21:03+5:30

या २४ सुविधा, उपक्रम; कार्तिकेयन एस. यांनी केले सादरीकरण

Fund of Rs 110 crores for 357 primary schools in Kolhapur district, Guardian Minister Prakash Abitkar gave information | कोल्हापूर जिल्ह्यातील ३५७ प्राथमिक शाळांसाठी ११० कोटींचा निधी, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली माहिती 

कोल्हापूर जिल्ह्यातील ३५७ प्राथमिक शाळांसाठी ११० कोटींचा निधी, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली माहिती 

कोल्हापूर : समृद्ध शाळा योजनेतून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३५७ प्राथमिक शाळांमध्ये २४ प्रकारच्या भौतिक सुविधा देण्यात येणार असून, यासाठी ११० रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. जिल्हा नियोजन समिती बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी या योजनेचे सादरीकरण केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

याबाबत अधिक माहिती देताना कार्तिकेयन एस. म्हणाले, जिल्ह्यात १९५७ शाळा असून प्रत्येक शाळेच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. या शाळांवर निधी खर्च होतो. परंतु, त्यामध्ये एकजिनसीपणा येत नाही. त्यामुळे गेले दीड वर्षे याबाबत सर्वेक्षण, चर्चा करून हा आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार त्या-त्या शाळांच्या गरजेनुसार २४ प्रकारच्या सुविधा प्रत्येक शाळेत निर्माण करून देण्यात येणार आहेत.

आधुनिक नवीन शाळा इमारत, उपलब्ध शाळेत गरज असलेल्या सुविधांची निर्मिती, अतिदुर्गम, धनगरवाड्यावरील शाळांना भौतिक सुविधा आणि नैसर्गिक आपत्तीवेळी साहाय्यभूत ठरणाऱ्या शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी अशा चार टप्प्यांत नियोजन करण्यात आले आहे. अशा पद्धतीने पाच वर्षांत या सर्व शाळांचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा वार्षिक निधी, खासदार, आमदार निधी, स्वयंसेवी संस्था आणि सीएसआरमधून निधी उभारण्यात येणार आहे.

५४ शाळांमध्ये आधुनिक स्वच्छतागृहे

जिल्ह्यातील ५४ शाळांमध्ये पहिल्या टप्प्यात ६ कोटी ३ लाख रुपये खर्च करून आधुनिक स्वच्छतागृहे उभारण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी सांगितले. तीन प्रकारच्या स्वच्छतागृहांचे नियोजन करण्यात आले असून, तेथील विद्यार्थी संख्या आणि उपलब्ध सुविधा याचा विचार करून ही स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. यावेळी सर्व शिक्षा अभियानचे अभियंता अमोल पाटील उपस्थित होते.

या २४ सुविधा, उपक्रम

नवीन वर्गखोल्या, शाळा दुरुस्ती, नवीन स्वच्छतागृह, स्वच्छतागृह दुरुस्ती, हॅंडवॉश स्टेशन्स, नवीन संरक्षक भिंत, संरक्षक भिंत दुरुस्ती, बाल रचना व रंगकाम, स्वागत कमान, विद्युत सुविधा, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वयंपाकगृह, परसबाग, वृक्ष लागवड, रेन वॉटर हार्वेस्टिंग, घनकचरा व्यवस्थापन, क्रीडा साहित्य, क्रीडांगण विकास, प्रयोगशाळा, आवश्यक फर्निचर, आरओ वॉटर, ध्वनी सुविधा, आवश्यक टेबल, बेंच, सौर विद्युत व्यवस्था.

Web Title: Fund of Rs 110 crores for 357 primary schools in Kolhapur district, Guardian Minister Prakash Abitkar gave information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.