Kolhapur: बोगस दाखल्यांआधारे बदल्या करून घेणारे चौघे प्राथमिक शिक्षक निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 14:22 IST2025-10-17T14:21:53+5:302025-10-17T14:22:27+5:30
दिवाळीआधीच सीईओंचा दणका, आणखी काहीजण गळाला लागण्याची शक्यता

Kolhapur: बोगस दाखल्यांआधारे बदल्या करून घेणारे चौघे प्राथमिक शिक्षक निलंबित
कोल्हापूर : बोगस दाखल्यांआधारे सोयीच्या बदल्या करून घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या चार शिक्षकांना बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी तडकाफडकी निलंबित केले. यामुळे प्राथमिक शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. सीपीआरमधील दिव्यांग आणि आजारपणाचे दाखले तपासण्याची प्रक्रिया अजूनही संपली नसून, आणखी काहीजण गळाला लागण्याची शक्यता आहे. या चौघांना गुरुवारी निलंबनाचे आदेश टपालाद्वारे पाठवण्यात आले.
प्राथमिक शिक्षकांच्या तीन महिन्यांपूर्वी बदल्या झाल्यानंतर राज्यभरातून दिव्यांग आणि आजारी खोट्या प्रमाणपत्रांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्या. त्यामुळे या सर्व कागदपत्रांची फेरपडताळणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार कोल्हापूरजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी ३५६ शिक्षकांची यादी सीपीआरला पाठवून दिली.
सप्टेंबर महिन्यात या पडताळणीला सुरुवात झाली. परंतु, सुमारे ७० हून अधिक शिक्षक पडताळणीसाठी गेले नव्हते. त्यांच्यासाठी पुन्हा मुदत वाढवून देण्यात आली. सीपीआरकडून टप्प्याटप्प्याने तपासणी अहवाल येत असून यातील कागदपत्रे सादर न केलेले दोघे आणि गैरहजर राहिलेले दोघे असे चौघे शिक्षक, शिक्षिका संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. याबद्दल प्राथमिक खातरजमा करून त्यांना बुधवारी निलंबित करण्यात आले.
यांना केले निलंबित
- शाहनूर वहाब कमलशा, उर्दू विद्यामंदिर मिणचे (ता. हातकणंगले)
- दीपककुमार पांडुरंग खाडे, मुख्याध्यापक विद्यामंदिर यळगूड (ता. हातकणंगले)
- अनिल बापू इंगवले, विद्यामंदिर पिरळ (ता. राधानगरी)
- अश्विनी कुमार कोळी, कन्या विद्यामंदिर आकिवाट (ता. शिरोळ)
नेमका प्रकार असा
यातील मेंदूचा आजार असलेले शाहनूर कमलशा आणि हृदयविकार असलेले अनिल इंगवले हे पडताळणीसाठी सीपीआरला गेलेच नाहीत. त्यांना नोटिसा काढल्यानंतरही ते गेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे अधिकृत कागदपत्रेच नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आले, तर खाडे यांनी पत्नीला कॅन्सर तर कोळी यांनी पतीला मेंदूचा आजार असल्याची कागदपत्रे जोडली होती. परंतु, या दोघांनाही अधिकृत कागदपत्रे सादर करता न आल्याने आणि या चौघांनीही सोयीच्या बदल्या करून शासनाची फसवणूक केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. कमलशा यांना आजरा, खाडे यांना पन्हाळा, इंगवले यांना चंदगड, तर कोळी यांना पन्हाळा पंचायत समितीमध्ये उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. खाडे हे आधी वि.मं. नदीकिनारा, ता. कागल येथे कार्यरत होते.
आणखी काहीजण जाळ्यात
अजूनही ही तपासणी आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. काहीजणांना संदर्भसेवेसाठी अन्य डॉक्टरांकडे पाठवण्यात आले आहे. त्यांचे अहवाल अजूनही आलेले नाहीत. त्यामध्येही काही जणांनी बोगसपणा केल्याचा संशय आहे.