Kolhapur: कळंबा गॅस स्फोटाचा फॉरेन्सिक अहवाल दोन दिवसांत, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 12:48 IST2025-09-03T12:47:48+5:302025-09-03T12:48:17+5:30
जुना राजवाडा पोलिसांची माहिती

Kolhapur: कळंबा गॅस स्फोटाचा फॉरेन्सिक अहवाल दोन दिवसांत, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार
कोल्हापूर : कळंबा येथील मनोरमा कॉलनीत २५ ऑगस्ट रोजी झालेल्या गॅस स्फोटाचा फॉरेन्सिक तपासणी अहवाल दोन दिवसांत येण्याची शक्यता आहे. अहवालातून गॅस स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याने, स्फोटाला कारणीभूत ठरलेल्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली.
कळंबा जेलच्या मागे असलेल्या मनोरमा कॉलनीत गॅसचा स्फोट होऊन शीतल भोजणे आणि त्यांचे सासरे अनंत भोजणे यांचा मृत्यू झाला. तसेच प्रज्वल आणि इशिका ही लहान मुले जखमी आहेत. घरगुती गॅसचा पुरवठा करणा-या पाइपलाइनला कर्मचा-यांनी एन्डकॅप लावली नसल्याने दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी वर्तवला आहे.
वाचा : कळंबा येथील गॅस स्फोटातील जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू, मृतांची संख्या दोन
स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिकच्या पथकाला पाचारण केले होते. त्या पथकाचा अहवाल दोन दिवसांत येण्याची शक्यता आहे. अहवाल प्राप्त होताच दोषींवर गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.