तेरवाड सरपंचासह पाचजणांवर गुन्हा

By Admin | Updated: August 22, 2015 00:59 IST2015-08-22T00:59:24+5:302015-08-22T00:59:24+5:30

जातिवाचक शिवीगाळ, मारहाण : १ सप्टेंबरपर्यंत कोठडी

Five people guilty of torture with Sarpanch | तेरवाड सरपंचासह पाचजणांवर गुन्हा

तेरवाड सरपंचासह पाचजणांवर गुन्हा

कुरुंदवाड : झोपाळ्यावर बसण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून लाथाबुक्क्यांनी मारहाणीसह जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तेरवाड सरपंच संजय नायकू अणुसे (वय ४३), मुलगा संग्रामसिंह संजय अणुसे (१९), पोलीस पाटील वीरुपाक्ष शंकर राजमाने (३१, सर्व, रा. तेरवाड, ता. शिरोळ), संजय ऊर्फ बनाज शिवराम खोंबारे (२८, रा. कुरुंदवाड) यांच्यासह एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, एकाच वेळी एवढ्या लोकांच्यावर जातिवाचक गुन्हा नोंद होण्याची कुरुंदवाडमधील पहिलीच घटना असून, न्यायमूर्ती आर. आर. काळे यांनी आरोपींना १ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. याबाबत किरण आप्पासो कांबळे (२२, रा. तेरवाड) यांनी येथील पोलिसांत फिर्याद दिली असून, इचलकरंजी ग्रामीण पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांनी चौकशी करून हा गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गुरुवारी (दि. २०) फिर्यादी किरण कांबळे, सुप्रिया आणुजे, शांताबाई तराळ आणि भाग्यश्री तराळ यांच्यात सायंकाळी चारच्या सुमारास झोपाळ्यावर बसण्यावरून वाद झाला होता. याचा राग मनात धरून संशयित आरोपी संजय अणुसे यांच्यासह पाचजणांनी रात्री सव्वा दहा वाजता बेकायदेशीर जमावाने फिर्यादीच्या घरात घुसून किरणला लाथाबुक्यांनी मारहाण केली. तिच्या अंगावरील कपडे फाडली. शिवाय किरण हिच्या आई-वडिलांनाही मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायदा व नागरी हक्क कायद्यान्वये हा गुन्हा दाखल केला आहे. पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. सरपंच अणुसे हे शिवसेनेचे असल्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. (वार्ताहर)

Web Title: Five people guilty of torture with Sarpanch