Kolhapur: कर्जाचे हप्ते थकले, बहाद्दरांनी वसुली अधिकाऱ्यालाच लुटले; पाचजणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:56 IST2025-08-14T12:56:02+5:302025-08-14T12:56:23+5:30
कळंबा रस्त्यात लुटीचे प्रकरण : तीन लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन संशयित विधीसंघर्षग्रस्त

Kolhapur: कर्जाचे हप्ते थकले, बहाद्दरांनी वसुली अधिकाऱ्यालाच लुटले; पाचजणांना अटक
कोल्हापूर : फायनान्स कंपनीच्या वसुली व्यवस्थापकाचा पाठलाग करून १ लाख ७० हजारांची बॅग काढून घेतल्याप्रकरणी पोलिसांनी सराईत चोरट्यांसह पाच जणांना बुधवारी अटक केली. यांच्याकडून ३ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सराईत गुन्हेगार विजय मोहन पुजारी (वय १९, रा. मंगोबा देवालयाजवळ, उचगाव, ता. करवीर), स्वरूप रमेश सावंत (२१), सुशांत भगवान कांबळे (२२, रा. दोघे लक्ष्मी कॉलनी, टेंबलाईवाडी, कोल्हापूर), अविनाश आनंदा मोहिते (३०), अनिकेत कृष्णात ताटे (२७, रा. दोघे इस्पुर्ली, ता. करवीर), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याशिवाय अन्य दोघे विधीसंघर्षग्रस्त बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई कारवाई केली.
गुन्हे अन्वेषणने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका स्मॉल फायनान्स कंपनीकडे वसुली व्यवस्थापक म्हणून काम करणारे सूरज बाळासाहेब पाटील (वय ३१, रा. माळवाडी, कांदे, ता. शिराळा, सध्या सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर) हे ४ ऑगस्टला इस्पुर्ली व येवती येथील बचत गटाच्यावतीने दिलेल्या कर्जाचे हप्ते वसुलीसाठी गेले होते. वसुलीचे १ लाख ७० हजार रुपये घेऊन कोल्हापुरात येताना त्यांना कळंबा परिसरात तिघांनी मारहाण करून लुबाडले होते.
दरम्यान, याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक करत होते. पथकाने खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार लूटमार सराईत गुन्हेगार विजय पुजारी व त्यांच्या साथीदारांनी केल्याचे पोलिस तपासात समोर आले. यावरून पोलिसांच्या पथकाने विजय पुजारी व त्यांच्या इतर दोन साथीदारांना टेंबलाई मंदिर परिसरातून अटक केली.
त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर इस्पुर्लीतील अविनाश मोहिते याने एका फायनान्स कंपनीचे कर्ज घेतले होते. मात्र, हप्ते देणे त्याला जमले नव्हते. वसुली व्यवस्थापक सूरज पाटील दारात येऊन हप्त्यांची मागणी करून जात होते. यासाठी त्यांनाच लुटण्याचा प्लॅन त्याने तयार केला. हा प्लॅन त्याने मित्र विजय पुजारी यास सांगितला होता. त्यानुसार सूरज पाटील यांना लुटले, अशी माहिती पोलिस चौकशीत उघड झाली.
लुटीतील पैसे वाटून घेतले
वसुली व्यवस्थापक पाटील यांना लुटल्यानंतर त्यांच्याकडे मिळालेले १ लाख ७० हजार रुपये पाच संशयित आरोपींनी समान वाटणी करून घेतली होती. दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांनाही यातील काही रक्कम देण्यात आली. पोलिसांनी चोरीची रकमेसह टॅब इतर मुद्देमालही जप्त केला.