‘हातकणंगले’ची वाया गेलेली पंधरा वर्षे : तालुक्याची प्रगती मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 01:15 AM2019-10-19T01:15:13+5:302019-10-19T01:17:12+5:30

या ठिकाणचा वस्त्रोद्योग पहिल्यांदाच एवढा डळमळीत झाला आहे. हजारो यंत्रमाग बंद पडले असून, आॅटोलूमची देखील कामे कमी झाली आहेत. नवी खाती सुरू होण्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे.

Fifteen years wasted of 'Hatkanangale' | ‘हातकणंगले’ची वाया गेलेली पंधरा वर्षे : तालुक्याची प्रगती मंदावली

‘हातकणंगले’ची वाया गेलेली पंधरा वर्षे : तालुक्याची प्रगती मंदावली

Next
ठळक मुद्दे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष ; अनेक प्रश्न प्रलंबित; सर्वाधिक शहरीकरणाचा मतदारसंघ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक शहरीकरण झालेलाआणि झपाट्याने विकसित झालेला तालुका म्हणून हातकणंगले तालुका ओळखला जातो. वारणा व पंचगंगा नदीच्या खोऱ्यात विखुरलेल्या या तालुक्यात हातकणंगले आणिइचलकरंजी हे दोन मतदारसंघ येतात. पण, गेल्या १५ वर्षांत येथील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सक्षम नेत्यांच्या अभावामुळे विविध पायाभूत सुविधांची वानवा जाणवते.

हातकणंगले तालुक्यात इचलकरंजी, पेठवडगाव, हुपरी या नगरपालिका, तर हातकणंगले ही नवीन नगरपंचायत आहे. जिल्ह्यातील हा एकमेव तालुका आहे, ज्यामध्ये चार नगरपालिका, तर शिरोली एमआयडीसी, लक्ष्मी इंडस्ट्रीज, आवाडे टेक्सटाईल पार्क, इचलकरंजीतील वस्त्रोद्योग आणि कागल पंचतारांकित एमआयडीसीचा काही भाग आहे. पण, पायाभूत सुविधांच्या बाबतीत हा तालुका पिछाडीवर राहत असल्याचे चित्र दिसते. सांगली-शिरोली रस्त्याचा प्रश्न गेली १० वर्षे रखडला आहे. हा रस्ता झाला असला तरी कामे अजूनही प्रलंबित असून, जो रस्ता झाला आहे तो देखील खराब आहे.

यासाठी आमदारांनी आंदोलने केली; पण सत्ता आल्यावर त्यांना हे काम पूर्ण करता आले नाही. त्याचप्रमाणे तालुका क्रीडा संकुल २००३ मध्ये मंजूर झाले, तर २००९ मध्ये त्याचा निधी वाढविण्यात आला. पण, आजअखेर हे संकुल भिजत पडले आहे. औद्योगिक वसाहतीत वडगाव येथील

एकही नवा प्रकल्प उभारला गेला नाही. वाढीव वीजदरामुळे फौंड्री उद्योग देखील अडचणीत आला आहे. शिरोलीत मार्बल आणि टाईल्स उद्योग बहरला आहे; पण त्यासाठी कोणतेही नियोजन नाही. इचलकरंजी नगरपालिका व परिसरातील गावांचा मिळून मतदारसंघ आहे. या ठिकाणचा वस्त्रोद्योग पहिल्यांदाच एवढा डळमळीत झाला आहे. हजारो यंत्रमाग बंद पडले असून, आॅटोलूमची देखील कामे कमी झाली आहेत. नवी खाती सुरू होण्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. गेल्या दहा वर्षांत एकही नवीन सूतगिरणी भागात सुरू झालेली नाही. २०१२ मध्ये इचलकरंजीत काविळीने थैमान घातल्यानंतर प्रदूषित पाणीप्रश्न ऐरणीवर आला; पण त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. वारणा अमृत योजनेचे घोंगडे भिजत पडले आहे.


आरोग्य सुविधांचा बोजवारा
मोठी लोकसंख्या असलेल्या तालुक्याच्या दोन्ही मतदारसंघांत आरोग्य सुविधांची दाणादाण उडाली आहे. याठिकाणी एकही उपजिल्हा रुग्णालय नाही. आयजीएम रुग्णालय, बळवंतराव यादव रुग्णालय याची अवस्था बघून आज तेथे एकही रुग्ण जाणार नाही. येथील लोकप्रतिनिधींनी देखील याबाबत कधीच आवाज उठवला नाही, हे दुर्दैव. महामार्गावरील अपघातांचे प्रमाण बघतट्रॉमा सेंटरची नितांत गरज असूनही याबाबत कधी पाठपुरावा होताना दिसत नाही.

शैक्षणिक हब, बेरोजगारी जादा
तालुक्यात विविध शैक्षणिक संस्था, निवासी शाळा, डीकेटीई, घोडावत इन्स्टिट्यूट, माने इन्स्टिट्यूट, डीवायपी शैक्षणिक संकुल, आदी अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. येथे दरवर्षी हजारो युवक शिक्षण घेतात; पण त्यांना परिसरात रोजगाराच्या संधी मिळत नाहीत. एमआयडीसीमध्ये फार कमी रोजगार मिळत आहे. तालुक्यात माहिती तंत्रज्ञान, वस्त्रोद्योग, फौंड्री, वाहन उद्योग वाढविण्याची सुवर्णसंधी असूनही लोकप्रतिनिधींच्या पातळीवर काहीच होत नाही.

Web Title: Fifteen years wasted of 'Hatkanangale'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.