केळीच्या दरातील घसरणीने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:21 IST2021-01-21T04:21:50+5:302021-01-21T04:21:50+5:30

कोपार्डे : उसाला १८ महिन्यांनंतर मिळणारे पैसे व न परवडणारा खर्च यामुळे जिल्ह्यात अनेक शेतकरी केळीच्या शेतीकडे वळले आहेत; ...

Farmers are facing difficulties due to fall in banana prices | केळीच्या दरातील घसरणीने शेतकरी अडचणीत

केळीच्या दरातील घसरणीने शेतकरी अडचणीत

कोपार्डे : उसाला १८ महिन्यांनंतर मिळणारे पैसे व न परवडणारा खर्च यामुळे जिल्ह्यात अनेक शेतकरी केळीच्या शेतीकडे वळले आहेत; पण यावर्षी कोरोनाने निर्यातीला ब्रेक लागल्याने व स्थानिक बाजारपेठेत केळीची मोठी आवक झाल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. आज पेठवडगाव, गडहिंग्लज व कोल्हापूर बाजार समितीत केळीला दर टनाला तीन - साडेतीन हजारांवर आला असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. जिल्ह्यातील हवामान सर्वच पिकांसाठी आल्हाददायक व पोषक आहे. येथील जमीनही अनेक पिकांचे उत्पादन घेण्यासाठी पोषक आहे. याचा फायदा घेण्यासाठी येथील शेतकऱ्यांचा आधुनिक व प्रायोगिक शेतीकडे मोठा कल आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऊसशेती हा शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय असला तरी ऊस पिकाखाली १८ महिने अडकणारी जमीन व एफआरपीपोटी मिळणारा दर दोन-दोन वर्षांनंतर मिळत असल्याने शेतकरी आता केळी पिकाकडे वळला आहे. मागील वर्षी याच काळात केळीचा दर १२ हजार ते १३ हजार टन होता; पण यावर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन आल्याने निर्यातीसाठी मर्यादा आल्या आणि स्थानिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात केळी आल्याने मागणीपेक्षा पुरवठा वाढल्याने शेतकऱ्यांना मिळणारा टनाचा दर तीन हजार ते साडेतीन हजारांवर आला आहे. यामुळे एकरी केळी उत्पादनात घातलेला खर्चही शेतकऱ्यांना मिळेनासा झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

........

नाशवंत माल असल्याने शेतकरी अडचणीत

मागील वर्षी जानेवारी, फेब्रुवारीमध्ये चांगला दर मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली. यामुळे स्थानिक बाजारपेठत मोठी आवक निर्माण झाली आहे. त्यात काढायला आलेला माल साठवणूक करण्याची शेतकऱ्यांकडे शीतगृहाची सोय नाही आणि केळी नाशवंत असल्याने व्यापारीही दर पाडून मागत असल्याचे चित्र आहे.

कोट..

मागील वर्षी याच काळात १२ हजार रुपये दर होता. यावर्षी असाच दर मिळाल्यास एकरी ३० टन उत्पादनातून अडीच - तीन लाख रुपये मिळतील अशी आशा होती; पण दर गडगडल्याने उत्पादन खर्च निघणे अवघड आहे.

नामदेव माने (केळी उत्पादक, गणेशवाडी)

Web Title: Farmers are facing difficulties due to fall in banana prices