ग्रामीण रुग्णालयांमध्ये मुदतबाह्य औषधे, उपकरणे पडून; कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या रुग्णालयांतील वास्तव
By समीर देशपांडे | Updated: November 17, 2025 12:43 IST2025-11-17T12:42:52+5:302025-11-17T12:43:28+5:30
ग्रामीण रुग्णालयांमधील भोंगळ कारभार समोर आला

ग्रामीण रुग्णालयांमध्ये मुदतबाह्य औषधे, उपकरणे पडून; कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या रुग्णालयांतील वास्तव
समीर देशपांडे
कोल्हापूर : अचानक केलेल्या तपासणीमध्ये कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमधील भोंगळ कारभार समोर आला आहे. काही ठिकाणी प्राथमिक गोष्टीही नीट आणि नेमकेपणाने पाळल्या जात नसल्याचे स्पष्ट झाले असून, संबंधित संस्थाप्रमुखांना याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. ४ ते १२ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत या चार जिल्ह्यांतील ३५ रुग्णालयांची अशी अचानक तपासणी करण्यात आली आहे. काही ठिकाणी पिण्यासाठी स्वच्छ पाणी नसल्याचे, तर काही ठिकाणी वैद्यकीय उपकरणे पडून असल्याचे दिसून आले.
या तपासणीसाठी प्रत्येकी दोन टीम करण्यात आल्या. यामध्ये स्वच्छता, आहार, धुलाई, मनुष्यबळ, औषध भांडार, रुग्णवाहिका आणि अन्य प्रशासकीय बाबींची पडताळणी आणि तपासणी करण्यात आली. काही ठिकाणी चांगली स्वच्छता ठेवण्यात आल्याचे आणि नीटनेटकेपणा दिसून आला, तर काही ठिकाणी याच्या उलट परिस्थिती पहावयास मिळाली. मुदतबाह्य औषधेही ठेवण्यात आल्याचे दिसून आले.
अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, वर्ग ३ आणि ४ कर्मचारी मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसल्याचेही यावेळी दिसून आले. काही ठिकाणी आहाराचा दर्जा चांगला आहे. वैद्यकीय अधिकारी तो रुग्णांना देण्याआधी चाखून पाहतात, तर काही ठिकाणी रुग्णांना आहारसेवाच दिली जात नाहीत हे देखील दिसून आले. १०२ रुग्णवाहिकांचा वापर रुग्णांच्या सेवेसाठी कमी प्रमाणात हाेत असल्याचे दिसून आल्यामुळे त्या-त्या ठिकाणी सूचनाही या पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या.
पन्हाळ्यावर अस्वच्छ पाणी
पन्हाळा ग्रामीण रुग्णालयामध्ये पिण्याच्या पाण्याची यंत्रणा अस्वच्छ असल्याचे दिसून आले. तर, खिडक्यांमध्ये पालापाचोळा अडकून होता. आयईसीचे साहित्य विनावापर पडून होते, तर वैद्यकीय उपकरणही विनावापर पडून असल्याचे या पथकाला दिसून आले.
जतमध्ये पंचकर्मचे टेबल विनावापर
सांगली जिल्ह्यातील जत ग्रामीण रुग्णालयातील पंचकर्मचे टेबल विनावापर पडून असून, स्वेदन पेटीचा वापर औषधे साठवण्यासाठी केला जात असल्याचे पहावयास मिळाले.
मंडणगडमध्ये अस्वच्छता
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड ग्रामीण रुग्णालयातील कचराही वेळेत काढला जात नसल्याचे पथकाला दिसून आले. कोपऱ्यात प्लास्टिकचा कचरा साठवून ठेवण्यात आला असून, शेजारीच मास्कसह अन्य कचरा पडला असून, या ठिकाणी काही दिवस झाडले नसल्याचेही पथकाला दिसून आले.
चिठ्ठीद्वारे रुग्णालयाची निवड
या तपासणी माेहिमेची माहिती आधीच कोणालाच देण्यात आली नव्हती. ज्या दिवशी तपासायला जायचे त्याच दिवशी चिठ्ठ्या टाकून रुग्णालय निवडण्यात आले आणि मग ही तपासणी करण्यात आली. त्यामुळे ही तपासणी पथके नेमक्या कोणत्या रुग्णालयाची तपासणी करणार आहेत, याची त्या रुग्णालयातील कोणालाही माहिती नव्हती.
सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनुसार या तपासण्या सुरू असून, यापुढच्या काळात या सर्वच रुग्णालयांतून आणखी चांगली रुग्णसेवा मिळावी, यासाठी आमचे सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. - डॉ. दिलीप माने, उपसंचालक, कोल्हापूर आरोग्य परिमंडळ