लक्ष्मीपुरी बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर थायलंड पार्किंगचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:22 IST2021-01-21T04:22:01+5:302021-01-21T04:22:01+5:30
कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील बँक ऑफ इंडिया ते चांदणी चौक हा बाजारपेठेतील मुख्य रस्ता सत्तर फूट रुंदीचा असूनही येथे बारमाही ...

लक्ष्मीपुरी बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर थायलंड पार्किंगचा प्रयोग
कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील बँक ऑफ इंडिया ते चांदणी चौक हा बाजारपेठेतील मुख्य रस्ता सत्तर फूट रुंदीचा असूनही येथे बारमाही वाहतूक कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगांवकर यांनी थायलंड पद्धतीने पार्किंगचा प्रस्ताव महापालिकेला सादर केला आहे. त्याला महापालिकेनेही सकारात्मक प्रतिसाद दिला असून, ही पार्किंग पद्धत लवकरच सत्यात उतरणार आहे.
लक्ष्मीपुरी बाजारपेठेतील हा ७० फुटी मुख्य रस्ता आहे. त्यात एका बाजूला २५, तर दुसऱ्या बाजूला १५ फूट असे ४० फुटांचे अतिक्रमण आहे. उरला फक्त तीस फुटांचा रस्ता, त्यातही एखादी चारचाकी किंवा अवजड वाहन आले तर वाहतूक कोंडी रोजचीच. त्यामुळे व्यापारी वर्ग वाहने पार्किंगला वैतागला आहे, ही बाब ओळखून जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगांवकर यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना थायलंड पद्धतीने पार्किंगचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यांनी रस्त्यावर पट्टे ओढण्यास मान्यता दिली आहे. त्याकरिता हवी ती मदतही देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे असे पार्किंग झाले तर पार्किंगचा प्रश्न निकाली निघणार असून, दोन्ही बाजूला पांढऱ्या रंगात चिन्हांकन केलेल्या ठिकाणी वाहने पार्किंग केली नाहीत तर शहर वाहतूक शाखेच्या क्रेनने ती उचलली जाणार आहेत. तसेच संबंधित वाहनधारकाला दंडही होईल. फेरीवाल्यांनी आपल्या गाड्या चिन्हांकनाच्या ठिकाणी लावल्या नाहीत तर त्या अतिक्रमण विभागातर्फे तत्काळ उचलल्या जातील.
थायलंड पद्धतीचे पार्किंग म्हणजे काय..
या पार्किंगमध्ये रस्त्याच्या कडेला दुकानापुढील पाच फुटांच्या अंतरावर दुचाकी त्यांनतर फेरीवाले उभे राहण्यासाठी चिन्हांकन, त्यानंतर पुन्हा चारचाकी पार्किंग, पुन्हा फेरीवाले असे चिन्हांकन केलेले पांढऱ्या रंगाचे पट्टे या रस्त्यावर मारले जाणार आहेत. त्यातून वाहतुकीला शिस्त लागणार आहे.
फोटो : २००१२०२१-कोल-नकाशा
ओळी : कोल्हापुरातील लक्ष्मीपुरीतील बँक ऑफ इंडिया ते चांदणी चौक या रस्त्यावर प्रस्तावित थायलंड पार्किंग प्रस्ताव आराखडा असा आहे.