अतिक्रमण कारवाईवरून वातावरण तापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:23 IST2021-02-10T04:23:19+5:302021-02-10T04:23:19+5:30
कोल्हापूर : शहरातील अतिक्रमण कारवाईवरून वातावरण तापले आहे. महाद्वार चौकातील फेरीवाल्यांना ताराबाई रोडवर बसण्यासाठीचे पट्टे मारताना तेथील दुकानदारांनी मंगळवारी ...

अतिक्रमण कारवाईवरून वातावरण तापले
कोल्हापूर : शहरातील अतिक्रमण कारवाईवरून वातावरण तापले आहे. महाद्वार चौकातील फेरीवाल्यांना ताराबाई रोडवर बसण्यासाठीचे पट्टे मारताना तेथील दुकानदारांनी मंगळवारी विरोध केला. दुकानात ग्राहकांना प्रवेश करण्यास, वाहने लावण्यास अडथळा होणार असून व्यवसायावरही परिणाम होण्याचा धोका असल्याचे सांगण्यात आले. फेरीवाल्यांच्या नेत्यांनीही महाद्वार चौकातील फेरीवाल्यांना हटवण्यास विरोध दर्शवला आहे. ताराराबाई रोडवर महापालिका कर्मचारी, फेरीवाले नेते, दुकानदारांमध्ये वादावादीचा प्रकार घडला. तणावपूर्ण वातावरणातच पट्टे मारण्यात आले.
महापालिकेकडून अंबाबाई मंदिराच्या १०० मीटरच्या परिसरातील फेरीवाल्यांना हटविण्यात येणार आहे. येथील फेरीवाल्याचे त्याच परिसरात १०० मीटरच्या पुढे पट्टे मारून पुनर्वसन केले जाणार आहे. १ बाय १ मीटरमध्ये पट्टे मारून फेरीवाल्यांना बसवण्यात येणार आहे. महापालिकेने यासाठी मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता ताराबाई रोडवर पट्टे मारण्याचे काम हाती घेतले. पोलीस बंदोबस्त, अग्निशमन दल, जेसीबी, डंपर, ट्रक असा फौजफाटा आणला होता. यावेळी तेथील दुकानदारांशी त्यांचा वाद झाला. आमच्या दारात अगोदरच काही फेरीवाले आहेत. असे असताना आणखीन फेरीवाले येथे बसवल्यास दुकानात ग्राहकांनी आत कसे यायचे, असा सवाल केला. यावर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अतिक्रमन निर्मूलन पथकप्रमुख पंडित पवार, इस्टेट अधिकारी सचिन जाधव यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सम- विषम पद्धतीने फेरीवाल्यांना दोन्ही बाजूंना बसवले जाईल, असेही त्यांनी म्हटले. महाद्वार रोडवरील बँक ऑफ इंडियासमोरील दुकानादारांनी हीच भूमिका घेतली.
चौकट
महालक्ष्मी धर्मशाळेसमोर धक्काबुक्की
महापालिकेचे कर्मचारी पट्टे मारत असताना महालक्ष्मी धर्मशाळेसमोरील कापड दुकानदाराने अक्षेप घेतला. दुकानात कसे जायचे. कापड विक्रेता येथे फेरीवाला बसवल्यास आमच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. काेरोनामुळे आगेदरच तोटा झाला आहे. त्यामुळे दुकानासमोर पट्टे मारू नयेत, अशी मागणी केली. यावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची मागणी धुडकावून पट्टे मारणे सुरूच ठेवले. यावेळी कर्मचाऱ्यांना त्यांना बाजूला करत पट्टे मारले. वरिष्ठांचा हा निर्णय असून तुम्ही त्यांना भेट असेही सांगितले. यावेळी धक्काबुक्कीचाही प्रकार घडला.
चौकट
कर भरतो, आमच्या व्यवसायाला अडचणी आणू नका
ताराबाई रोडवरील शिवराम प्लाझा येथे पट्टे मारताना दुकानदारांनी विरोध दर्शवला. आम्ही महापालिकेचे घरफाळा, परवाना फी भरतो. असे असताना आमच्या व्यवसायाला अडचणी आणू नका, दारात आमच्या व्यवसायाशी संबंधित फेरीवाला बसल्यास व्यवसायवर परिणाम होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
चौकट
फेरीवाला कृती समितीने विचारला जाब
ताराबाई रोडवर पट्टे मारण्यास फेरीवाला कृती समितीने विरोध दर्शवला. यावेळी सुरेश जरग, किरण गवळी, प्र.द. गणपुले यांनी १ बाय १ मीटरमध्ये व्यावसायिक उभा राहू शकत नाही. मग त्यांनी व्यवसाय कसा करायचा, असा सवाल केला. एका फेरीवाल्याने पट्ट्यात बसूनही दाखवले. बॉक्सचे अंतर वाढवण्याची मागणी केली. गेल्या ४० वर्षांपासून मंदिर परिसरात फेरीवाले व्यवसाय करतात. त्यांना आहे तेथेच पट्टे मारून द्यावेत, असे सांगितले. शिवसेनेचे धनाजी दळवी यांनी समितीसोबत चर्चा, बैठक झालेली नाही. येथील फेरीवाल्यांवर कारवाई करू नका, असे म्हटले.
चौकट
...तर चौथ्या मजल्यावरून उडी मारू
महालक्ष्मी धर्मशाळेसमोरील एका यात्री निवास चालकाने चौथ्या मजल्यावर यात्री निवास असून ग्राहकांनी आत
प्रवेश करता येणार नसल्याने पट्टे मारू नका, अशी विनंती केली. यावर महापालिका कर्मचाऱ्यांनी नियमानुसार कारवाई सुरू असल्याचे म्हटले. यावर चालकाने कमी दरात भक्तांना जेवण आणि राहण्याची सोय करतो. येथे पट्ट मारू नका, असे सांगितले. यावर अधिकाऱ्यांनी नियमानुसार प्रक्रिया सुरू असून अडवे पडू नका अन्यथा यात्री निवासवरच कारवाई करावी लागेल, असे ठणकावून सांगितले. यावर संतप्त यात्री निवास चालकाने तसे केल्यास चौथ्या मजल्यावरून उडी घेऊ, असा इशारा दिला.
फोटो : ०९०२२०२१ कोल केएमसी अतिक्रमण कारवाई १
ओळी : कोल्हापुरातील महाद्वार चौकातील फेरीवाल्यांचे ताराराबाई रोडवर पुनर्वसन केले जाणार आहेत. तेथे पट्टे मारण्याचे काम मंगळवारी महापालिनेे केले. यावेळी एक बाय एकच्या जागेत बसता येत नाही तर व्यवसाय कसा करणार, असा सवाल फेरीवाल्यांनी केला.
फोटो : ०९०२२०२१ कोल केएमसी अतिक्रमण कारवाई २
फोटो : ०९०२२०२१ कोल केएमसी अतिक्रमण कारवाई ३
ओळी : कोल्हापूर महापालिकेचे कर्मचारी ताराराबाई रोडवर पट्टे मारत असताना तणावपूर्ण वातावरण झाले. यावेळी फेरीवाल्यांनी प्रशासनाला अडवून जाब विचारला. फेरीवाल्यांवर कारवाई नको, आहे तेथेच व्यवसाय करण्याची भूमिका ठाम पणे मांडली.
फोटो : ०९०२२०२१ कोल केएमसी अतिक्रमण कारवाई ४
ओळी : ताराबाई रोडवर महापालिकेने फुटपाथवरच फेरीवाल्यांसाठी पट्टे मारले.
(छाया : नसीर अत्तार)