महाराष्ट्र, गोवा बार काउन्सिलसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; मतदान, मतमोजणी कधी...जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 12:27 IST2026-01-23T12:26:46+5:302026-01-23T12:27:39+5:30
Maharashtra, Goa Bar Council Election: अर्ज भरताना किती रुपये शुल्क भरावे लागणार..वाचा

संग्रहित छाया
कोल्हापूर : महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या निवडणुकीची घोषणा गुरुवारी (दि. २२) झाली. महाराष्ट्रासह गोवा, दादरा नगर हवेली आणि दमण-दिव येथे २४ मार्च रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर १५ दिवसांत निकाल अपेक्षित आहे. बार काउन्सिलसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या वाढल्याने निवडणूक चुरशीने होण्याचे संकेत मिळत आहेत.
महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या रखडलेल्या निवडणुकीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी आहे. त्यामळे उमेदवारी मिळविण्यासाठी दोन्ही राज्यातील इच्छुकांमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली आहे. कोल्हापुरातून तीन उमेदवार इच्छुक असून यात एका महिला प्रतिनिधीचाही समावेश आहे.
सांगली, सातारा, पंढरपूर, सोलापूर आणि सिंधुदुर्गमधून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी प्रचार यंत्रणा गतिमान केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन बार असोसिएशनची भेट घेऊन आपली भूमिका मांडली जात आहे. तसेच प्रचारासाठी सोशल मीडियाचाही आधार घेतला जात आहे. महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली, दमण आणि दिव येथून सुमारे एक लाख ६० हजार वकील मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावेळी संचालक मंडळात प्रथमच पाच महिलांना संधी मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक महिला उमेदवारांची संख्या वाढली आहे.
हे मुद्दे येतील चर्चेत
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे पूर्ण खंडपीठात रूपांतर करणे, ज्युनिअर वकिलांसाठी स्टायपेंड सुरू करणे, वकील सुरक्षा कायदा, ई-फायलिंमधील अडचणी आणि आपत्कालीन निधी वाढविण्याचे मुद्दे निवडणुकीच्या प्रचारात असतील.
शुल्क ४० हजारांवरून सव्वा लाख
यापूर्वी झालेल्या निवडणुकीत उमेदवारांना अर्ज भरताना ४० हजार रुपये शुल्क आकारणी केली जात होती. यात वाढ झाली असून उमेदवारांना एक लाख २५ हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क उमेदवारांना परत मिळणार नाही.
यांची नावे चर्चेत
कोल्हापुरातून काउन्सिलचे माजी अध्यक्ष विवेक घाटगे, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अजित मोहिते यांच्यासह शैलजा चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. पंढरपूरमधून धनश्री घाडगे, महेश कसबे, सातारा जिल्ह्यातून वसंतराव भोसले, सोलापुरातून माजी संचालक मिलिंद थोबडे आणि सिंधुदुर्गमधून माजी संचालक संग्रामसिंह देसाई यांची नावे चर्चेत आहेत.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
- घोषणा - २२ जानेवारी
- अर्ज भरणे - २६ फेब्रुवारी
- अर्जांची छाननी - २८ फेब्रुवारी
- उमेदवार यादी जाहीर - १ मार्च
- माघार - २ ते ४ मार्च
- अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध - ४ मार्च
- मतदान - २४ मार्च
- निकाल - मतदानानंतर १५ दिवस