Kolhapur: कळंबा येथील गॅस स्फोटातील जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू, मृतांची संख्या दोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 16:23 IST2025-08-30T16:22:16+5:302025-08-30T16:23:40+5:30
घरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून गॅसची गळती होऊन मोठा स्फोट झाला होता

Kolhapur: कळंबा येथील गॅस स्फोटातील जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू, मृतांची संख्या दोन
कोल्हापूर : कळंबा येथील मनोरमा कॉलनीत झालेल्या गॅस स्फोटात गंभीर जखमी झालेले अनंत देवाजी भोजणे (वय ६०) यांचा उपचारादरम्यान आज, शनिवारी (दि. ३०) सकाळी सीपीआरमध्ये मृत्यू झाला. सोमवारी (दि. २५) रात्रीच्या सुमारास झालेल्या स्फोटात ते गंभीर जखमी झाले होते. शीतल भोजणे यांच्यानंतर त्यांचे सासरे अनंत भोजणे यांचा मृत्यू झाल्याने या दुर्घटनेतील मृतांची संख्या दोन झाली आहे.
घरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून गॅसची गळती होऊन मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात शीतल भोजणे, त्यांचे सासरे अनंत भोजणे, मुलगा प्रज्वल आणि साडेतीन वर्षांची मुलगी इशिका हे गंभीर जखमी झाले होते. यातील शीतल यांचा मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अनंत भोजणे यांचा शनिवारी सकाळी सीपीआरमध्ये मृत्यू झाला.
वाचा- गणेशोत्सवाला कोकणात जाण्यापूर्वीच भोजने कुटुंबावर काळाचा घाला, गॅस स्फोटाने कुटुंब उद्ध्वस्त
सुमारे ७० टक्क्यांहून जास्त भाजल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. शुक्रवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली. शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली.