वनघुबड, स्वर्गीय नर्तकमुळे पश्चिम घाटाचे सौंदर्य खुलले

By Admin | Updated: December 19, 2014 00:11 IST2014-12-18T23:59:56+5:302014-12-19T00:11:49+5:30

अभ्यास दौरा : ‘निसर्ग मित्र’च्या पाहणीत आढळले दुर्मीळ वनस्पती, पक्षी

Due to late dancers, the beauty of the Western Ghats opened | वनघुबड, स्वर्गीय नर्तकमुळे पश्चिम घाटाचे सौंदर्य खुलले

वनघुबड, स्वर्गीय नर्तकमुळे पश्चिम घाटाचे सौंदर्य खुलले

कोल्हापूर : महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवर असणाऱ्या दुर्मीळ जैवविविधतेमुळे या परिसराचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित झाले आहे. या जंगलात तपकिरी वनघुबड, तपकिरी शेपटीचा स्वर्गीय नर्तक (सुरंगी), मलबार पीट वायपर साप, खाजखुजली वनस्पती, अशा दुर्मीळ जैवविविधता आढळल्या. जागतिक पर्यावरण मासानिमित्त आणि ‘सह्याद्री वाचवा’ अभियानांतर्गत ‘निसर्ग मित्र’च्यावतीने दुर्मीळ जैवविविधतेच्या अभ्यास व नोंदीसाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता.
या अभ्यास दौऱ्यात आजरा, तिलारी, चंदगड, चौर्ले यासह आसपासच्या जंगलांत पदभ्रमंती करून निसर्ग अभ्यास करण्यात आला. या अभ्यास दौऱ्यात अत्यंत दुर्मीळ असणारे केवळ आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, गोवा, कर्नाटक, केरळ परिसरात आढळणारे तपकिरी वनघुबड (ब्राऊन वूड आऊल), तसेच लांब शेपटीचा स्वर्गीय नर्तक सुरंगी (एशियन पॅराडाईज फ्लायक्चर) आणि मलबार पीट वायपर साप व झुबक्याने येणारी गोलाकार चपटी व तपकिरी रंगाची लव असणारी ही खाजखुजली वनस्पती (मक्युना मोनसपर्मा) या जाती आढळली.
या अभ्यास दौऱ्यात अनेक दुर्मीळ वनौषधींसह पशू-पक्षी व प्राण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.
हा अभ्यास दौरा डॉ. अशोक वाली, किशोर शिंदे, नितीन कारंजे, रियाज मुल्ला, अनिल चौगुले यांनी केला. (प्रतिनिधी)

Web Title: Due to late dancers, the beauty of the Western Ghats opened