अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2015 01:23 IST2015-10-18T00:30:12+5:302015-10-18T01:23:00+5:30

नवरात्रौत्सव : संतानलक्ष्मी रूपात पूजा

Due to Ambabai's look, devotees started flowing | अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरूच

अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरूच

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला शनिवारी करवीरनिवासिनी अंबाबाईची संतानलक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली. जुना राजवाड्यातील तुळजाभवानीची दाक्षिणात्य रूपात पूजा बांधण्यात आली. अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा ओघ शनिवारीही होता. दुपारनंतर काहीअंशी गर्दी कमी झाली.
शनिवारी सकाळी अंबाबाईचा शासकीय अभिषेक झाल्यानंतर दुपारची आरती करण्यात आली. देवीची संतानलक्ष्मी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली.आजची पूजा मयूर मुनीश्वर, अरुण मुनीश्वर, सोहम मुनीश्वर, रवी माईणकर यांनी बांधली. दिवसभरात माउली आध्यात्मिक भजनी मंडळ, सानेगुरुजी भजनी मंडळ, ज्ञानाई सांस्कृतिक मंडळ, आदी संस्थांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. रात्री साडेनऊ वाजता देवीची पालखी काढण्यात आली. अभियंता नेत्रदीप सरनोबत, मनीष पोवार, देवस्थानचे सदस्य राजेंद्रअण्णा देशमुख, हिरोजी परब, डॉ. जयश्री कटारी, उपायुक्त (सेल्स टॅक्स), लालबहादूर कटारी यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले.
लाडू प्रसाद गायब
देवस्थान समितीने ऐन नवरात्रात लाडू प्रसादाचा ठेका बदलल्याचा त्रास भाविकांना सहन करावा लागत आहे. ज्यांना हा ठेका दिला गेला त्या संस्थेला अद्याप भाविकांच्या संख्येचा अंदाज आलेला नाही. शनिवारी तर लाडूप्रसाद नव्हताच.
उलाढाल लाखोंत...
परिसरात मात्र रोज लाखोंची उलाढाल होत आहे. देवीसाठीची साडी, वेणी, तेल, कापूर, उदबत्ती या पूजेच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. याशिवाय फूलवाले, रांगोळी, वस्त्रमाळ अशा साहित्याची विक्री होत असल्याने सध्या एका दिवसातील उलाढाल लाखोंत होत आहे.
दुपारनंतर गर्दी ओसरली..
शनिवारीदेखील अंबाबाईला भाविकांची गर्दी होती. सकाळी महिला भाविकांची रांग शेतकरी बझारच्या दारात चार पदरी करून फिरविण्यात आली. भाविकांच्या पायांना चटके बसू नयेत म्हणून ही सोय करण्यात आली होती. दुपारी चारनंतर मात्र गर्दी ओसरली.

Web Title: Due to Ambabai's look, devotees started flowing