मद्यधुंद कारचालकाचा कोल्हापुरातील महाद्वार रोडवर थरार, तीन महिला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 12:42 IST2025-06-11T12:04:34+5:302025-06-11T12:42:00+5:30

नागरिकांनी कारचालकास चोपले

Drunk driver rams into car on Mahadwar Road in Kolhapur, three women injured | मद्यधुंद कारचालकाचा कोल्हापुरातील महाद्वार रोडवर थरार, तीन महिला जखमी

मद्यधुंद कारचालकाचा कोल्हापुरातील महाद्वार रोडवर थरार, तीन महिला जखमी

कोल्हापूर : गर्दीने गजबजलेल्या महाद्वार रोडवर पापाची तिकटीकडून उलट्या दिशेने घुसलेल्या मद्यधुंद कारचालकाने बेदरकारपणे कार चालवत तीन महिलांना धडक दिली. नागरिकांनी पाठलाग करून गुजरी कॉर्नरला कार अडवली. कारमधून बाहेर ओढून कारचालक आणि त्याच्या मित्राला चोप दिला.

वाहतूक पोलिसांनी वेळीच धाव घेऊन मद्यधुंद कारचालक प्रसाद दत्तात्रय सुतार (वय २९, रा. वखार भाग, सांगली) आणि त्याचा मित्र समीर अब्दुलनबी नदाफ (३०, रा. सिव्हिल चौक, सांगली) यांना ताब्यात घेतले. हा प्रकार मंगळवारी (दि. १०) रात्री आठच्या सुमारास घडला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, एक आलिशान कार पापाची तिकटी येथून वन-वे तोडून महाद्वार रोडकडे निघाली होती. मद्यधुंद कारचालकाने प्रथम दत्त महाराज गल्लीच्या कॉर्नरला लावलेल्या चारचाकीला धडक दिली. त्यानंतर नागरिकांनी आरडाओरड सुरू केल्यानंतर त्याने कार आणखी वेगाने पळवली. जिरगे बोळ येथून निघालेल्या दोन महिलांना धडक देऊन तो कारचालक बेफामपणे कार दामटत पुढे गेला.

गुजरी कॉर्नरला वाहतूक पोलिस संतोष करनुरकर आणि मंजुनाथ बेळमकर यांनी कार अडवली. त्यानंतर कारचा पाठलाग करत आलेल्या संतप्त नागरिकांनी कारचालकाला बाहेर ओढून त्याला चोप दिला. वाहतूक पोलिसांनी मद्यधुंद कारचालकासह त्याच्या मित्राला लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ऐन गर्दीच्या वेळी भरधाव कारने वाहनांसह महिलांना धडक दिल्याने नागरिकांनी थरार अनुभवला. सुदैवाने मद्यधुंद कारचालकाला वेळीच अडवण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.

कारमध्ये आढळल्या दारूच्या बाटल्या

गुजरी कॉर्नरला कार अडवून त्यातील दोघांना बाहेर ओढताच नागरिकांना कारमध्ये दारूच्या बाटल्या आढळल्या. दोघेही दारूच्या नशेत असल्याचे लक्षात येताच त्यांना बेदम चोप दिला. सांगलीतील एका संघटनेचे पदाधिकारी असल्याचे दोघे सांगण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, नागरिकांनी त्यांची यथेच्छ धुलाई केली.

Web Title: Drunk driver rams into car on Mahadwar Road in Kolhapur, three women injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.