Kolhapur Crime: मालमत्तेच्या वादातून डॉक्टर मुलीने चावा घेत वडिलांचे बोट तोडले, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 17:48 IST2025-11-19T17:47:00+5:302025-11-19T17:48:03+5:30
अंगावर दुचाकी घातली, लाथा-बुक्क्यांनी मारहाण

संग्रहित छाया
गडहिंग्लज : मालमत्तेच्या वादातून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर मुलीने चावा घेतल्याने वडिलांच्या बोटाचा पुढील भाग तुटला. याप्रकरणी मुलगी डॉ. शुभांगी सुनील निकम (वय ४३, रा. बेळगुंदी, ता. गडहिंग्लज) हिच्याविरुद्ध गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत गणपतराव विष्णू हळवणकर (वय ७८, रा. केदार कॉलनी, गिजवणे) हे जखमी झाले आहेत.
पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, गणपतराव हळवणकर आणि त्यांच्या दोन मुली डॉ. शुभांगी व ज्योती यांच्यात मालमत्तेच्या वाटणीवरून वाद आहे. ११ व १४ नोव्हेंबरला डॉ. शुभांगी हिने पैशाच्या कारणावरून शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली होती. त्याबाबत गणपतरावांनी पोलिसात तक्रार दिली होती.
शनिवारी (१५) सायंकाळी सहाच्या सुमारास गणपतराव हे फिरण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. पेट्रोल पंपाजवळ येताच शुभांगी हिने अंगावर दुचाकी घातल्याने ते रस्त्यावर कोसळले. ‘माझ्याविरुद्ध पोलिसात तक्रार करतोस काय, तुला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी दिली. शिवीगाळ करून वडिलांना लाथ-बुक्क्यांनी मारहाण केली.
दरम्यान, स्वत:चा बचाव करताना शुभांगीने गणपतराव यांच्या उजव्या हाताच्या तर्जनी बोटाचा जोरात चावा घेतला. त्यामुळे बोटाचा पुढील भाग तुटून रक्तस्राव सुरू झाला. त्याची माहिती त्यांनी मुलगा उदयला दिली. उदयने त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथील प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सीपीआरला पाठविण्यात आले आहे. उदय हळवणकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. हेडकॉन्स्टेबल दिलीप पाटील अधिक तपास करीत आहेत.
रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले
फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने घटनास्थळ आणि जखमी गणपतराव यांच्या कपड्यावरील रक्ताचे डाग आणि त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. डॉ. शुभांगी यांच्यावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली असून गुन्ह्याची सुनावणी अपर पोलिस अधीक्षकांसमोर होणार आहे.