अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याने सांगून डॉक्टर पिता, पुत्रास ४३ लाखांचा गंडा, कोल्हापुरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 12:14 IST2025-08-30T12:14:08+5:302025-08-30T12:14:36+5:30
तोतया पोलिस निरीक्षकाचे कृत्य, न्यायालयाच्या बनावट पत्राचा वापर

अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याने सांगून डॉक्टर पिता, पुत्रास ४३ लाखांचा गंडा, कोल्हापुरातील घटना
कोल्हापूर : तुमचा अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याने तुम्हाला सुप्रीम कोर्टाचे अरेस्ट वॉरंट काढलेले आहे, असे सांगून राजारामपुरीतील डॉ. महेश्वर दत्तात्रय शितोळे (वय ३५) आणि त्यांचे वडील डॉ. दत्तात्रय शितोळे यांना ४२ लाख ९१ हजार रुपयांस तोतया पोलिस निरीक्षकाने गंडा घातला. डिजिटल अटकेची भीती दाखवून कुलाबा येथून बोलणाऱ्या तोतया पोलिस निरीक्षकाने ही फसवणूक केली. ९ ते २८ ऑगस्टदरम्यान ही घटना घडली.
डॉ. दत्तात्रय शितोळे यांचे राजारामपुरी पहिल्या गल्लीत शितोळे हॉस्पिटल आहे. त्यांचा मुलगा डॉ. महेश्वर हे वडिलांना हॉस्पिटलमध्ये मदत करतात. डॉ. महेश्वरच्या पत्नी अक्षरा याही डॉक्टर आहेत. आईही डॉक्टर असून इस्लामपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत. डॉ. महेश्वर हे वारणानगर येथे दमयंती हॉस्पिटल चालवतात. ९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वारणानगर येथील हॉस्पिटलमध्ये असताना डॉ. महेश्वर यांच्या मोबाईलवर फोन आला. मी मुंबई कुलाबा येथून बोलत असून तुमच्या मोबाईल नंबरचा वापर करून एका भामट्याने मुंबईत तुमच्या नावाने आधार कार्ड, बॅँक पासबुक काढले आहे.
अतिरेकी संघटनांना पैसे पाठविण्यासाठी त्याचा वापर झाला आहे. भविष्यात तुम्हाला अडचणी येणार आहेत. मी तुम्हाला या प्रकरणात मदत करतो, असे सांगितले. यानंतर डॉ. दत्तात्रय शितोळे यांना कॉल करून तुमच्या मुलास अटक होईल, अशी भीती दाखवून वेळोवेळी ४२ लाख ९१ हजार रुपये स्वीकारले. आपली फसवणूक झाल्याचे डॉक्टर पिता-पुत्रांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात ४२ लाख ९१ हजार रुपयांची फसवणुकीची फिर्याद दिली.
नॅशनल सिक्युरिटी प्रोटोकॉलची भीती
तोतया पोलिस निरीक्षक रॉय याने डॉ. शितोळे पित्रा, पुत्रास नॅशनल सिक्युरिटी प्रोटोकॉलची भीती घालून घरच्यांनाही माहिती देऊ नका, असे सांगितले होते. अंगावरील खाकी वर्दी, पोलिस ठाण्याची इमारत, सर्वोच्च न्यायालयाची अटकेची नोटीस दाखवत विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. चौकशी संपल्यानंतर पैसे तुमच्या खात्यावर वर्ग केले जातील, असे सांगून फसवणूक केली.