Navale Bridge Accident: जयसिंगपूरच्या धनंजयचे नाट्यकलेतील स्वप्न अधुरेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 12:27 IST2025-11-15T12:26:49+5:302025-11-15T12:27:08+5:30
व्यवसाय सांभाळत अभिनयाची आवड जोपासलेल्या धनंजयची एक्झिट मनाला चटका लावणारी ठरली

Navale Bridge Accident: जयसिंगपूरच्या धनंजयचे नाट्यकलेतील स्वप्न अधुरेच
जयसिंगपूर : कष्ट करून अभिनयाचे स्वप्न पाहणाऱ्या जयसिंगपूर येथील धनंजयकुमार कोळी (वय ३०, रा. पहिली गल्ली, दत्त मंदिरशेजारी) याच्या अपघाती निधनामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. केवळ स्वप्ने बघून नाही तर ती पूर्ण करण्यासाठी अतोनात कष्ट करण्याची त्याची तयारी होती. नाट्यक्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न बाळगून तो गेल्या पाच-सहा वर्षांपासून पुण्यात राहात होता. मात्र, अपघाती निधनाने त्याचे स्वप्न अधुरेच राहिले.
नाट्यक्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून धनंजय हा पुण्यात राहात होता. त्याला लहानपणापासून नाट्यक्षेत्रात अभिनयाची आवड होती. त्यातूनच तो गेल्या पाच-सहा वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होता. अभिनयाला जोड म्हणून त्याने प्रवासी वाहतुकीच्या दोन गाड्या घेतल्या होत्या. वाहने भाड्याने देण्याचा त्याचा व्यवसाय होता. कलेची आवड जोपासत त्याने आपला अभिनय सुरू ठेवला होता. लहान-मोठ्या नाटकांमध्ये तो काम करायचा.
अभिनेते प्रशांत दामले यांच्यासोबतही त्याला अभिनयाची संधी मिळाली होती. घरची जबाबदारीही त्याच्यावर होती. महिन्यातून दोनवेळा तो जयसिंगपूरला यायचा. जयसिंगपूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांना तो आवर्जून उपस्थित राहायचा. वर्षभरापूर्वी त्याचे लग्न झाले होते. गुरुवारी (दि. १३) पुण्यातील नवले ब्रिजजवळ अपघातात धनंजयचा मृत्यू झाला. त्याच्या निधनाने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
व्यवसाय सांभाळत अभिनयाची आवड जोपासलेल्या धनंजयची एक्झिट मनाला चटका लावणारी ठरली आहे. शुक्रवारी सकाळी त्याच्यावर उदगाव येथील वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नाट्यशुभांगीकडून त्याला आदरांजली वाहण्यात आली.
स्वप्न काळाच्या पडद्याआड
रंगमंचावर करिअर करण्याचे स्वप्न बाळगून व्यवसायाबरोबर अभिनय करणाऱ्या धनंजयचे अपघाती निधन झाले. त्याचे स्वप्न काळाच्या पडद्याआड गेले. अनेक स्वप्ने, आकांक्षा त्याने बाळगल्या होत्या. मात्र, अपघाती निधनामुळे त्याचे स्वप्न अधुरेच राहिले.