कोल्हापुरात पावसाची उघडीप, तरी पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; ५८ बंधारे पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 13:36 IST2025-06-26T13:35:48+5:302025-06-26T13:36:14+5:30
धरणक्षेत्रात जोरदार पाऊस: चौदा मार्ग पाण्याखाली, वाहतूक विस्कळीत

कोल्हापुरात पावसाची उघडीप, तरी पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; ५८ बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी पावसाची उघडझाप सुरू असली तरी धरण क्षेत्रात जोरदार कोसळत आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ३१००, वारणातून १३ हजार ७७४ तर दूधगंगेतून १४ हजार १८७ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांंच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी ३४ फुटांपर्यंत पोहोचली असून तिथे इशारा (३९ फूट) पातळीकडे आगेकूच सुरू केल्याने कोल्हापूरकरांची धाकधूक वाढली आहे.
मंगळवारच्या तुलनेत कोल्हापुरात पावसाचा जोर कमी असला तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.
धरण क्षेत्रात सरासरी १५० मिलीमीटर पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. ‘वारणा’, ‘दूधगंगा’ मधून विसर्ग वाढवला आहे. राधानगरी धरण ६७ टक्के भरले असून वारणा धरण ६४ टक्के भरले आहे. नद्यांची पातळीत वाढ होत असून पंचगंगा नदीची पातळी ३४ फुटांपर्यंंत पोहोचली आहे. पाणी पात्राबाहेर पसरू लागले आहे.
एस. टी.च्या फेऱ्या विस्कळीत
जिल्ह्यातील ५८ बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्याचा फटका एस. टी. वाहतुकीला बसला असून पर्यायी मार्गाने वाहतूक करावी लागत आहे.
चौदा मार्ग पाण्याखाली
जिल्ह्यातील २४ राज्य मार्गांपैकी ५ मार्गावर पाणी आल्याने बंद आहे. त्याचबरोबर ९ प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली गेले आहेत.
पडझडीत १३.६२ लाखांचे नुकसान
जिल्ह्यात बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत ४४ खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. त्यामध्ये १३ लाख ६२ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.