ग्राहक धोरण २४ रोजी जाहीर करा

By Admin | Updated: December 19, 2014 00:45 IST2014-12-19T00:43:47+5:302014-12-19T00:45:26+5:30

सूर्यकांत गवळी : मुख्यमंत्र्यांकडे मागणी, शासकीय यंत्रणांशी संवाद

Declaration of Customer Policy on 24th | ग्राहक धोरण २४ रोजी जाहीर करा

ग्राहक धोरण २४ रोजी जाहीर करा

कोल्हापूर : ग्राहक दिनादिवशीच म्हणजे २४ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे ग्राहक धोरण जाहीर करावे, अशी मागणी ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत गवळी यांनी आज, गुरुवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात विविध शासकीय यंत्रणांशी संवाद साधण्यासाठी बैठक आयोजित केली होती. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गवळी म्हणाले, ग्राहक चळवळीचे जाळे विणण्यासाठी तसेच ग्रामीण भागात ही चळवळ मोठी करावी, रुजावी या हेतूने १६ नोव्हेंबरपासून नागपूर येथून दौरा सुरू केला आहे. ‘एक जिल्हा, एक दिवस’ या स्वरुपात नागपूर, मुंबई, ठाणे, अमरावती, नाशिक या विभागांत जिल्हावार भेटी दिल्या आहेत.
राज्यात १२ ठिकाणी ग्राहक संरक्षण समित्या स्थापन झाल्या आहेत. ज्या ठिकाणी झालेल्या नाहीत तेथे त्वरित कराव्यात, अशा सूचना दिल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी मनीषा देशपांडे, दीपक खाडे, रवी पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

ग्राहक कल्याण सल्लागार समिती अध्यक्षांच्या सूचना
गवळी म्हणाले, ग्राहक संरक्षण विभाग स्वतंत्रपणे करावा, याला वेळ लागणार असेल तर या विभागासाठी स्वतंत्रपणे सचिव नियुक्त करावेत.
या विभागाला स्वतंत्रपणे बजेट तरतुद करावी, ग्राहकांचे प्रश्न वा फसवणुकीबाबत त्यांना त्वरित न्याय मिळावा यासाठी तालुका, जिल्हा स्तरावर ग्राहकदूत किंवा ग्राहक संपर्कप्रमुख नेमावेत.
२४ डिसेंबरला भारतीय ग्राहक दिन व १५ मार्च जागतिक ग्राहक दिन साजरे करावेत, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद २४ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यांतून स्थापन कराव्यात व महिन्याला बैठका व्हाव्यात.
ग्राहकांच्या प्रबोधनासाठी प्रत्येक कार्यालयाने चार प्रदर्शने भरवावीत, आदी मागण्यांसाठी शासनाकडे प्रयत्न केले जाणार आहेत.

Web Title: Declaration of Customer Policy on 24th